मुंबई : घराच्या मालकिच्या वादातून कांदिवली येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या ६५ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी ४ जणांना अटक केली. कांदिवलीच्या लालजीपाडा येथे राहणाऱ्या यादव आणि जोगेश्वरी येथे राहणाऱ्या चौहान कुटुंबियांमध्ये कांदिवली येथील एका घराच्या मालकीवरून वाद होता. याप्रकरणात पोलिसांकडेही तक्रार अर्ज देण्यात आले होते.
दोन गटात हाणामारी
हा वाद मिटला नव्हता. चौहान कुटुंबातील १० ते १५ जण शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी यादव यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. त्यांनी घरावर दावा करत यादव कुटुंबावर काठ्या, बांबू, आणि दांडक्याने हल्ला केला. यावेळी यादव आणि चौहान कुटुंबियांत हाणामारी झाली. मात्र चौहान कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्यने होेते आणि ते हल्ला करण्याच्या उद्देशाने तयारीने आले होते. त्यांनी यादव कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात यादव कुटुंबातील ५ जण जखमी झाले. रामलखन यादव (६५) या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होेते.
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
यादव यांना सुरवातीला उपचारासाठी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी छातीत दुखू लागल्याने त्यांना ५ सप्टेंबर रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना यादव यांचा मृत्यू झाला.
चार जणांना अटक
या प्रकरणी चार आरोपीेंना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला कांदिवली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) (खून करण्याचा प्रयत्न) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
मात्र यादव यांच्या मृत्यूनंतर कलम १०३ (२) (हत्या) वाढवण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.