मुंबई : केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. पशूखाद्य, कोंबडी खाद्य आणि चाऱ्यासाठी मक्याला मागणी वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी हंगामात मक्याची लागवड दुप्पटीने वाढून ४.८४ लाख हेक्टरवर गेली आहे.

राज्यातील रब्बी हंगामातील पेरण्या उरकल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत १० लाख ५९ हजार ९३१ हेक्टरने लागवड वाढली आहे. प्रामुख्याने मक्याच्या लागवडीत दुप्पटीने वाढ झाली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र २ लाख ५८ हजार ३२१ हेक्टर होते. गतवर्षी ३ लाख ३७ हजार ९३५ हेक्टरवर पेरणी झाली होती, यंदा ४ लाख ८४ हजार ११ हेक्टरवर लागवड झाली आहे.

केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. पशूखाद्य आणि कोंबडी खाद्य म्हणून मक्याला मागणी आहेच. पशूधनाला चारा म्हणून मक्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे गत वर्षात मक्याचे दर ३० रुपये किलोंवर गेले होते. त्यामुळे रब्बी हंगामात देशभरात मक्याच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातही तशीच स्थिती आहे. सरासरीच्या तुलनेत दुप्पटीने मक्याची लागवड वाढली आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. गतवर्षीचे पेरणी क्षेत्र ५७ लाख ८० हजार ९९९ हेक्टर होते. यंदा ६४ लाख ५६ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बीच्या पेरण्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत १० लाख ५९ हजार ९३१ हेक्टरने वाढ झाली आहे.

रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली आहे. सरासरी १७.५३ लाख हेक्टर क्षेत्र होते, ते १५.४० लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १०.४८ लाख हेक्टर होते, यंदा ते १३.०६ लाख हेक्टरवर गेले आहे.

हरभरा २१.५२ लाख हेक्टर क्षेत्र होते, ते २८.८६ लाख हेक्टरवर गेले आहे. मटकी, मसूरसह अन्य कडधान्यांची लागवड क्षेत्र १.१७ लाख हेक्टर होते, यंदा ते १.५९ लाख हेक्टर झाले आहे. तेलबियांची लागवड सरासरी ५५.६६ हजार हेक्टर होते, ते गतवर्षी ७२.६९ हजार झाले होते, यंदा ६८.८१ हजार हेक्टर झाले. तेलबियांच्या लागवड क्षेत्रात यंदा घट झाली आहे. करडईचे क्षेत्र सरासरी २६.६५ हजार हेक्टर होते, गतवर्षी ४३.३६ हजार हेक्टर झाले, यंदा ३४.६५ हजार हेक्टरवर आले. जवसाची ५९१७ हेक्टर, तीळाची २०२९ हेक्टर, सूर्यफुलाची २३५४ हेक्टर तर मोहरी, भुईमूग आदींची २३,८५७ हेक्टरवर लागवड झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील स्थितीचे राज्यात प्रतिबिंब

यंदा देश पातळीवर गहू आणि मक्याच्या लागवडीत मोठी वाढ दिसून आली आहे. राज्यात गव्हाचे क्षेत्र फार नाही, तरीही सरासरीच्या तुलनेत तीन लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मक्याचे क्षेत्र २.५८ लाखांवरून ४.८४ लाखांवर गेले आहे. खाद्यतेलाच्या आयातीमुळे तेलबियांना हमीभाव मिळत नाही. कडधान्य आयातीमुळे कडधान्यांनाही हमीभाव मिळत नाही. त्यामुळे राज्यात तेलबिया आणि कडधान्यांच्या लागवडीत घट झालेली दिसून येत आहे.

इथेनॉलमुळे मका लागवड वाढली

केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. पशुखाद्य, कोंबडी खाद्य आणि चारा पीक म्हणून मक्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात मक्याच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती कृषी संचालक (विकास आणि विस्तार) रफीक नाईकवाडी यांनी दिली.