मुंबई : माहीम येथे भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकलने ७२ वर्षीय व्यक्तीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मोटरसायकलस्वाराला माहीम पोलिसांनी अटक केली असून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

या अपघातात अब्दुल रहिम गुलाम हुसैन सुरती (७२) यांचा मृत्यू झाला. तक्रारीनुसार, माहीम येथील बोलमिया लेन, आर. सी माहीम स्कूलजवळील खान हाऊससमोर शनिवारी रात्री ८.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी सुरती यांची सून मोहसिना फैजान सुरती हिच्या तक्रारीवरून माहीम पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १८४, १०६ (१), १२५ (ब) व २८१ अंतर्गत मोटरसायकलस्वार फैजान फेजुल शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, मोहसिना तिचे सासरे अब्दुल रहिम, पती फैजान, आणि सात वर्षांचा मुलगा फिजेन याच्यासोबत माहीम येथील काळा बंगलासमोरीलल सियापोसवाडीत राहतात. त्या ब्युटीपार्लरचा व्यवसायक करतात, तर त्यांचे पती खाद्यपदार्थ वितरणाचे काम करतात. शनिवारी ती तिच्या मुलासोबत माहेरी आली होती. यावेळी तिचे सासरे अब्दुल रहिम आर. सी माहीम स्कूलजवळून खान हाऊससमोरून पायी चालत येत होते. त्यावेळी भरवेगात धावणार्या मोटरसायकने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अब्दुल रहिम हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला, तोंडाला, हाता-पायांना गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्त्राव होत होता. याबाबतची माहिती मोहसिना यांना मिळाल्यानंतर त्या घटनास्थळी पोहोचल्या. इतर पादचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सासर्यांना तातडीने टॅक्सीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी करून अब्दुल सुरती यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर तात्काळ मोटरसायकस्वार फैजान फेजुल शेखला स्थानिक रहिवाशांनी ताब्यात घेतले. अपघाताची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रहिवाशांनी आरोपी फैजान फेजुल शेखला पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहसिना यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी फैजान शेखला अटक करण्यता आली. तो गोवंडीतील टाटानगर परिसरातील रहिवासी आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याला याप्रकरणी जामीन देण्यात आला.