मुंबईः वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णालयातून घरी परतणाऱ्या ५२ वर्षीय महिलेचा मालाडमधील मार्वे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनाने महिलेला धडक दिल्यानंतर चालकाने त्यांना कोणतेही वैद्यकीय मदत न करता तेथून पलायन केले. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.
मृत महिलेचे नाव वंदना गाला (५२) असून त्या कांदिवलीमध्ये वास्तव्यास होत्या. अपघात नुकताच मार्वे रोडवरील मेगसन्स दुकानाजवळ झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. वंदना गाला गुरुवारी मालाडमधील अग्रवाल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या होत्या. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी रस्ता ओलांडताना त्यांना भऱधाव वेगा आलेल्या अज्ञात मोटारगाडीने जोरात धडक दिली.
मोटारगाडीची धडका बसताच त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी चालकाने तेथून पलायन केले. तेथे उपस्थित इतर पादचाऱ्यांनी तात्काळ त्यांना कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती पोलिसांकडून वंदना यांचे भाऊ शैलेश विरा, परेश विरा यांना देण्यात आली. त्यानंतर तेही तात्काळ शताब्दी रुग्णालायात दाखल झाले. तेथे त्यांना बहिणीच्या मृत्यूची दुःखद बातमी समजली.
वंदनाच्या मृत्युमुळे गाला कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी परेश विरा यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय दंड संहिता व मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रत्यक्षदर्शींकडून अपघाताबाबतची माहिती घेण्यात येत असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अपघातानंतर पीडितेला कोणतीही वैद्यकीय मदत केली नाही. पोलीस अथवा आपत्कालीन सेवांना माहिती न देता चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण ताब्यात घेतले असून आरोपीचे वाहन आणि चालकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत असून, काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या माहितीच्या आधारे आरोपी वाहनचालकाला लवकरच अटक केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.