मुंबई – एका इसमाने ११ वर्षाच्या मुलाच्या अंगावर सोडलेल्या कुत्र्याने मुलाच्या हनुवटीचा चावा घेतला. मानखुर्दमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. हा मुलगा रिक्षाच्या मागच्या आसनावर बसला असताना कुत्र्याच्या मालकाने त्याच्या अंगावर कुत्रा सोडला होता. त्यानंतर घटनेची चित्रफितही तयार केली. कुत्रा मुलाला चावत असताना कुत्र्याचा मालक हसत होता. या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत असून मानखुर्द पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमधील इमारत क्रमांक १९-ए च्या समोर ही घटना घडली होती. १७ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ११ वर्षीय मुलगा एका उभ्या असलेल्या रिक्षाच्या मागील आसनावर बसलेला होता. त्याच परिसरात राहणारा सोहेल खान (४३) हा त्याचा पाळीव कुत्रा घेऊन रिक्षात बसला. कुत्र्याला पाहून मुलगा घाबरला होता. सोहेलने त्याला आणखी घाबरविण्यासाठी कुत्रा त्याच्या मागील आसनावर नेला. ते पाहून मुलगा अधिकच घाबरला आणि गयावया करू लागला. सोहेल खान मात्र गंमत बघत होता. त्यावेळी कुत्र्याने मुलाच्या हनुवटीचा चावा घेतला. मुलगा कसाबसा सुटला आणि धावू लागला. मुलावर नंतर मानखुर्द येथील स्थानिक दवाखान्यात उपचार करण्यात आले.
चित्रफित तयार केली.
सोहेल खानने पाळीव कुत्रा रिक्षात बसलेल्या मुलाच्या अंगावर सोडला त्या प्रसंगाची चित्रफितही तयार करण्यात आली. मुलगा घाबरत असताना सोहेल मदत करण्याऐवजी हसत होता. कुत्रा मुलाच्या अंगावर जात असताना त्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवले नाही. कुत्र्याने त्याचा चावा घेतला आणि मुलगा रडून पळू लागला. तेव्हा देखील सोहेल जोरात हसत होता, असे या चित्रफितीमध्ये दिसून येत होते.
चित्रफितीनंतर गुन्हा दाखल
पीडित मुलाचे वडिल हलीम खान (३४) हे ॲण्टॉप हिल येथे कामाला जातात. मुलाला कुत्रा चावल्याची माहिती त्यांना कामावर असताना मिळाली होती. मात्र रात्री त्यांना ही चित्रफित मिळाली. त्यांनी याबाबत मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोहेल खान विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९१ (पाळीव प्राण्यांपासून इतराची सुरक्षितता धोक्यात आणणे) १२५ आणि १२५-अ (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सोहेल खानला नोटीस बजावली असून पुढील कारवाई सुरू आहे.
श्वानदंशाच्या वाढत्या घटना चिंताजनक
मुंबई आणि आसपासच्या परिसरात श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांतील वाढत्या श्वानदंशाची एका अहवालानुसार, मुंबईत दरवर्षी किमान ३५ ते ४० हजार जणांना कुत्रे चावतात. श्वान नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण केले जाते. कुत्रा चावल्याने अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, ज्यात सर्वात महत्त्वाचा आणि प्राणघातक म्हणजे रेबीज होतो. रेबीज हा एक विषाणूजन्य आजार आहे जो प्राण्यांच्या लाळेतून मानवी शरीरात प्रवेश करतो. वेळेत उपचार मिळाले नाहीत तर रेबीज हा १०० टक्के प्राणघातक ठरतो. भारतात दरवर्षी सरासरी २९ हजार नागरिकांचा रेबीजने मृत्यू होतो.