मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पुलावर खड्डे चुकवत जात असताना दुचाकी सरकल्यामुळे बुधवारी झालेल्या अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला. दुचाकी सरकल्यानंतर दोघांच्याही अंगावरून डंपर गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

नाझीर शहा(४३) व छाया खिलारे(४३) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील पुलावरील उत्तर वाहिनीवर बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात घडला. दुचाकीस्वार नायगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी पुलावरील खड्डे चुकवत असताना त्यांची दुचाकी कोसळली. त्यानंतर मागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली ते आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिली. नाझीर व छाया या दोघांनीही हेल्मेट घातले होते, पण डंपर दोघांच्याही पोटावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून डंपर चालक सलीम शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चालकाने आपण दुचाकीला धडक दिली नसल्याचे सांगितले आहे. दोघेही दुचाकीवरून कोसळले. त्यानंतर डंपर खाली आले. डंपर चालकाविरोधात भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांनाही चिरडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातानंतर चालक घटनास्थळीच थांबला, त्याने पलायन केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत दांपत्य अंधेरी पूर्व येथील रहिवासी आहेत. छाया या चित्रपट व मालिकांसाठी मेकअप आर्टिंस्ट म्हणून काम करत होत्या. तर पती क्रिएटीव्ह विभागात कार्यरत होते. दोघांना एक सहा वर्षाचा मुलगा आहे. दोघेही पूर्वी मीरा रोड परिसरात वास्तव्याला होते. सध्या हे दाम्पत्य नाझीरच्या आईसोबत अंधेरी येथे राहत होते. चित्रीकरणासाठी दोघेही नायगाव येथे जात असताना हा अपघात घडला.