मुंबई : मोबाइलवर येणारे विविध अनावश्यक, तसेच सायभर भामट्यांच्या फसवणुकीच्या फोनमुळे सध्या सगळेच त्रस्त आहेत. हे फसवणुकीचे फोन बंद करून देते असे सांगून अंधेरीतील एका व्यक्तीची ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एका ओटीपीच्या आधारे त्याचा मोबाइल हॅक करून त्याआधारे ४९ हजार रुपयांची खरेदी करण्यात आली. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या प्रत्येकाला दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचे अनावश्यक फोन येत असतात. कुणी बॅंकेची योजना सांगतो, तर कुणी गुंतवणूक करण्यास सांगतो. असे मोबाइल क्रमांक ब्लॉक केले, तरी ते अन्य मोबाइल क्रमांकावरून फोन करीत असतात. यापैकी बहुतांश फोन सायबर भामट्यांचे असतात. ते वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली सायबर फसवणूक करीत असतात. याशिवाय कुणालाही फोन केल्यास ‘सायबर फसवणूकीपासून सावध रहा’ अशा आशयाची कॉलर ट्यून ऐकावी लागते. कामाच्या वेळी सतत येणारे असे फोन आणि विनाकारण ऐकाव्या लागणाऱ्या कॉलर ट्यूनमुळे सारेच त्रस्त आहेत.
गॅरेज चालविणारा रामकेश यादव (३५) अंधेरीत राहतो. तो दिवसभरात अशा अनावश्यक फोनमुळे त्रस्त झाला होता. त्याला २ मे २०२५ रोजी एका महिलेचा फोन आला. सध्या मोबाइलवर सारखे फसवणुकीचे फोन येत असतात, ते थांबवायचे आहेत का ? अशी विचारणा त्या महिलेने केली. यादव याने त्याला तात्काळ होकार दिला. त्यानंतर यादवच्या मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात आला. हा ओटीपी यादवने त्या महिलेला सांगितला. आता तुम्हाला कुणाचेच अनावश्यक फोन येणार नाहीत, सायबर फसवणूक होणार नाही आणि कॉलर ट्यूनही ऐकावी लागणार नाही, असे त्या महिलेने सांगितले.
मात्र तरी देखील यादव याला असे फोन येत होते. हा प्रकार नंतर तो विसरून गेला. दरम्यान, ११ जून रोजी त्याला एसबीआय क्रेडीट कार्डमधून एक फोन आला. यादव याच्या क्रेडीट कार्डाचा वापर करून ४८ हजार ९०० रुपयांची खरेदी करण्यात आली होती. त्या रकमेचा परतावा करण्याबाबत हा कॉल होता. ते ऐकून रामकेश यादवला धक्का बसला. त्याने कुठल्याही प्रकारची खरेदी केली नव्हती. नंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचा उलगडा झाला. फसवणुकीचे फोन बंद करण्याच्या नावाखाली त्याचीच फसवणूक करण्यात आली होती.
याप्रकरणी यादवने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड), ६६ (क), तसेच फसवणुकीच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर भामट्याने यादव यांना ओटीपी पाठवून मोबाइल हॅक केला. नंतर क्रेडीट कार्डाचे तपशील मिळवून खरेदी केली, असे ओशिवरा पोलिसांनी सांगितले.