मुंबई : मराठी रंगभूमीवरील विविध बालनाट्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक त्यापैकीच एक. हे व्यावसायिक बालनाट्य आता एका विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात गुरूवार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सकाळी ७.१५ ते रात्री १०.३० या वेळेत या नाटकाचे ६ प्रयोग होणार आहेत. या नाटकाने १५ ऑगस्ट २०१८ रोजी एकाच दिवशी ५ प्रयोग केले होते, आता एकाच दिवशी ६ प्रयोग करत, नाटकाची टीम नवा विक्रम करणार आहे.

अद्वैत थिएटर्स निर्मित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी, दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले असून राहुल भंडारे हे निर्माते आहेत. या नाटकात लक्षवेधी अशा चेटकिणीची भूमिका निलेश गोपनारायण यांनी साकारली आहे. तर सनीभूषण मुणगेकर आणि श्रद्धा हांडे हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. छत्रपती श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ६ प्रयोग होणार आहेत. प्रत्येक प्रयोग हा निःशुल्कपणे १०० गोरगरीब व विशेष मुलांना दाखविण्यात येणार असून त्यांच्याशी कलाकार गप्पाही मारणार आहेत. यावेळी ठाण्यातील ‘वंचितांची रंगभूमी’ या संस्थेतील कलाकारांनाही प्रयोग दाखविण्यात येणार आहे.

हेही वाचा : रेल्वेरुळांवर कर्मकांडांचे स्तोम, चेंबूर स्थानकालगत कचऱ्याचे ढीग; रेल्वे प्रशासनासमोर नवे आव्हान

दरम्यान, या विश्वविक्रमाबाबत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्याकडे अर्ज करून पूर्वकल्पना देण्यात आली आहे. रंगभूमीवर एक व्यावसायिक बालनाट्य पहिल्यांदाच असा विश्वविक्रम करीत आहे, यादृष्टीने हे अर्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक आम्ही एक बांधिलकी म्हणून करीत आहोत. त्यामुळे प्रयोगाच्या माध्यमांतून जमा होणारी काही रक्कम सेवाभावी संस्थांना मदत म्हणून देण्याचा आमचा नेहमीच मानस असतो. जर नवा प्रेक्षक करायचा असेल, तर बालरंगभूमीकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे’, असे राहुल भंडारे यांनी सांगितले.

हेही वाचा : म्हाडाला १२०० कोटी ? पत्राचाळीतील तीन भूखंड विक्रीचा निर्णय; लवकरच निविदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रयोगस्थळी डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्टची टीम तैनात

‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाचे एकाच दिवशी ६ प्रयोग होणार असल्यामुळे कलाकार व तंत्रज्ञांची मानसिक व शारीरिकदृष्ट्या काळजी घेण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. पहिला प्रयोग सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी आहे. त्यामुळे विविध ठिकाणी राहणाऱ्या कलाकार व तंत्रज्ञांची धावपळ होऊ नये म्हणून त्यांची आदल्या दिवशी दादर परिसरात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात संपूर्ण दिवस चार डॉक्टर, आहारतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट तैनात असतील. प्रत्येक प्रयोगाच्या आधी व नंतर ते कलाकारांची तपासणी करतील. तसेच आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचारही करतील. कलाकार व तंत्रज्ञांना पुरेशी विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यदिनापूर्वी आठवडाभर आधी व नंतर कुठेही प्रयोग करण्यात येणार नाहीत.