मुंबई: पूर्व उपनगरातील गोवंडी परिसरातील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या पाच – सहा महिन्यांपासून ईसीजी तंत्रज्ञाची जागा रिक्त आहे. परिणामी, शताब्दी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना ईसीजी काढण्यासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. सध्या शताब्दी रुग्णालयातील अन्य विभागातील खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने केवळ अत्यवस्थ रुग्णांचेच ईसीजी काढण्यात येत आहेत.

शताब्दी रुग्णालयात दररोज गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, चेंबूर, आणि देवनार परिसरातील ५०० ते ६०० रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, औषधांचा तुटवडा आशा अनेक समस्या रुग्णांना भेडसावत आहेत. त्यातच गेल्या पाच – सहा महिन्यांपासून ईसीजी तंत्रज्ञाची जागा रिक्त आहे. परिणामी, शताब्दी रुग्णालयात तंत्रज्ञाअभावी ईसीजी काढण्याची सुविधा नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

हेही वाचा : मुंबई: अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक

शताब्दी रुग्णालय शीव-पनवेल महामार्ग, घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता आणि पूर्व मुक्त मार्गाला लागून आहे. परिणामी एखादा अपघात झाल्यास पहिल्यांदा जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यानंतर त्यांना शीव अथवा केईएम रुग्णालयात पाठवण्यात येते. मात्र येथे ईसीजी तंत्रज्ञच नसल्याने रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत रुग्णांनी अनेक तक्रारी केल्यानंतर काही दिवसांपासून येथील इतर विभागांतील खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून रुग्णांचे ईसीजी करण्यात येत आहे. मात्र हा तंत्रज्ञ पुरुष असल्याने अत्यवस्थ महिलांना खासगी रुग्णालयातच जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ याची दखल घेऊन तंत्रज्ञाची भरती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.