मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर रक्त चाचणी करणाऱ्या केंद्रामधील कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून रक्त चाचण्या करणे बंद केले आहे. परिणामी, रुग्णांना रक्त चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत जावे लागत आहे. त्यामुळे रक्त चाचणीची जबाबदारी सोपविलेल्या संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे.
गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, देवनार आणि आसपासच्या परिसरातून दररोज ५०० रुग्ण येत असतात. यापैकी १०० ते १५० रुग्णांची रक्त चाचणी करणे आवश्यक असते. गेल्या काही वर्षांपासून पालिकेने कृष्णा डायनोजस्टिक या कंपनीला रुग्णालयातील रक्त चाचणी केंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास दिले आहे. शताब्दी रुग्णालयातील रक्त चाचणी केंद्र हीच कंपनी चालवित आहे. मात्र तीन महिन्यापासून या केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून रक्त चाचण्या करणे बंद केले आहे.
हेही वाचा : खासदार अनिल देसाई यांच्या निकटवर्तीया विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल
दरम्यान, रक्त चाचणी केंद्रातील काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात येईल, असे कृष्णा डायनोजस्टिक कंपनीतील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. कंपनी आणि कर्मचाऱ्यांमधील भांडणात सर्वसामान्य रुग्ण भरडले जात आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रुग्णांनी केली आहे. “रुग्णालयातील रक्त चाचणी केंद्रात रुग्णांच्या चाचण्या बंद करण्यात आल्याची बाब तत्काळ संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेच्या रक्त चाचणी केंद्रात त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत”, असे शताब्दी रुग्णालयाचे अधिष्ठाता सुनील पाकळे यांनी म्हटले आहे.