मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचे (आधीचा कर्नाक) लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आले. या पुलाचे कर्नाक हे जुने नाव बदलून या पुलाचे नाव सिंदूर असे ठेवण्यात आले आहे. भारतीयांवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर कर्नाकचा काळा इतिहास पुसून टाकला, अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. हा पूल मुंबईकरांना समर्पित केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पुलाचे उद्घाटन झाल्यामुळे गुरुवारी दुपारपासून या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व पालिकेचे पूल विभागातील अभियंते उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने अतिशय कमी वेळात या पुलाचे उत्कृष्ट बांधकाम केले. विशेषत: रेल्वे रुळावरून जाणारा आणि दाटीवाटीच्या भागात असलेल्या या पुलाच्या बांधकामात अनेक अडचणी आल्या होत्या. तरीही नियोजित मुदतीच्या आत महापालिकेने या पुलाचे काम पूर्ण केले. त्यामुळे पालिका आयुक्त व पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार, अभियंत्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
कर्नाक नावाचा काळा इतिहास
कर्नाक नावाचा इतिहास सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक वर्ष आपण या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळखत होतो. पण कर्नाक हा ब्रिटिश गव्हर्नर होता. भारतीयांवर अत्याचार करणारा कर्नाकचा असा त्याचा इतिहास आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱ्याच्या इतिहासात ‘प्रतापसिंग छत्रपती आणि रंगोबापूर’ असे एक प्रकरण आहे. कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात कसे अडकवण्याचा प्रयत्न केला याचा उल्लेख त्यात आहे. त्याला कसे प्रतापसिंग महाराज पुरून उरले त्याचे अतिशय उत्कृष्ट वर्णन या प्रकरणात आहे. भारतीयांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाकच्या काळ्या इतिहासाची पाने पुसली पाहिजेत, म्हणून पुलाचे नाव बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरवरून नामकरण
इतिहासात जी काळी पाने आहेत ती पुसली पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात इतिहासातील या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणून या पुलाचे नाव बदलण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने अतुलनीय शौर्य दाखवले आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे ते दाखवून दिले. पाकिस्तानमध्ये जाऊन भारत हल्ला करू शकतो, अतिरेक्यांचे तळ कशा पद्धतीने उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवले. त्यामुळे भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या पुलाला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव द्यावे आम्हाला वाटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसे पत्र महानगरपालिकेला दिले. काळ्या इतिहासाच्या खुणा पुसून पुलाचे नाव ‘सिंदूर’ ठेवण्यास महापालिका प्रशासनाने मान्यता दिली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.