मुंबई : सहा महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबईतील रस्त्यावर पुन्हा एकदा क्लिन अप मार्शल सक्रिय होणार आहेत. मुखपट्टीचा वापर ऐच्छिक केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुदत संपत आलेल्या क्लिन अप मार्शलच्या नियुक्तीच्या कंत्राटाला पूर्णविराम दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यासाठी क्लिन अप मार्शल नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, घाण करणे, राडारोडा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने क्लिन अप मार्शलची नियुक्ती केली होती. करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मुखपट्टीचा वापर न करणाऱ्याविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी क्लिन अप मार्शलवर सोपवण्यात आली होती. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर क्लिन अप मार्शलची सेवा संपुष्टात आली. त्यानंतर आता सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा क्लिन अप मार्शलची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले “मुंबईतील सर्वच रस्ते…”

‘हॉटेल द ललीत’मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी

मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांच्या हद्दीत क्लिन अप मार्शल नेण्यात येणार आहेत. क्लिन अप मार्शल नागरिकांना विनाकारण त्रास देतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात अशा तक्रारी अनेक वेळा मुंबई महानगरपालिकेकडे करण्यात आल्या आहेत. असे प्रकार घडू नयेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने विविध उपाययोजनाही केल्या. क्लिन अप मार्शलना नागरिकांशी संवाद साधण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले, तोतया क्लिन अप मार्शल ओळखता यावे यासाठी प्रशासनाने नियुक्त केलेल्यांना ओळखपत्र व त्यांचे नाव असलेला गणवेश देण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पुन्हा एकदा या मार्शलच्या नेमणुका होणार आहेत. प्रत्येक विभागात ३० मार्शल तैनात करण्यात येणार असून त्यांची सेवा एक वर्षासाठी असेल. २००७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदा क्लिन अप मार्शलची नियुक्ती केली होती. मात्र नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही योजना बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी २०११ मध्ये केली. मात्र २०१६ मध्ये पुन्हा क्लिन अप मार्शलच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.