मुंबई : मित्र सारखे पार्टी मागत असल्याने एका स्वयंपाक्याने आपल्या मालकाच्या घरात चोरी करण्याचे ठरवले. मात्र प्रत्यक्षात त्याच्या हाती सोन्याचे घबाड लागले. तो १५ लाखांचे दागिने घेऊन दिल्लीत पळून गेला. परंतु दिंडोशी पोलिसांनी माग काढत त्याला अटक केली.

आरोपी छोटे मुखिया (३२) स्वयंपाकी आहे. मुंबई उपनगरातील विविध ठिकाणी तो स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. मागील महिन्यात तो मालाड पूर्व येथे राहणाऱ्या एका आयात – निर्यातदार व्यावसायिकाच्या घरात स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. नंतर त्याने ते काम सोडले. मुखियाकडे त्याचे मित्र मद्य, मेजवानी मागत होते. मात्र मेजवानी द्यायची कशी असा प्रश्न मुखिया पुढे होता. अखेर त्याने एक शक्कल लढवली. तो काम करीत असलेल्या मालाडच्या आयात – निर्यातदार व्यावसायिकाच्या घरात चोरी करण्याचा निर्णय त्याने घेतला. या व्याससायिकाच्या घरात अनेक मौल्यवान वस्तू, तसेच पैसे ठेवल्याचे त्याला माहीत होते. त्याातील काही पैसे चोरले तर कुणाच्या लक्षात येणार नाही, असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने चोरीची योजना आखली.

२८ मे रोजी हे व्यावसायिक कुटंबासह अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. हीच संधी साधून त्याने चोरीची योजना आखली. या इमारतीत त्याचा वावर होता. त्यामुळे इमारतीत त्याला सहज प्रवेश मिळाला. गच्चीवरून पाईपवरून तो सहाव्या मजल्यावरील घरात आला आणि खिडकीतून घरात प्रेवश केला. तक्रारदाराच्या खोलीतील काही रक्कम चोरण्याचा त्याचा उद्देश होता. मात्र त्याला एका खोलीत दागिने सापडले. अवघ्या काही पैशांची चोरी करण्यासाठी तो आला होता, परंतु प्रत्यक्षात त्याला सोन्याचे घबाड मिळाले. एकूण १५ लाखांचे दागिने त्याच्या हाती लागले. ते दागिने घेऊन तो लगेच दिल्लीत पळून गेला. घर मालक ३१ मे रोजी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सोने घेऊन पळण्याच्या प्रयत्नात तो सीसी टीव्ही कॅमेऱ्यात दिसला. पोलिसांनी तांत्रिक तपास करीत त्याचा माग काढला आणि दिल्लीच्या लाजपत नगर येथून त्याला मुद्देमालासह अटक केली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षय अजय आफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटेवार आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.