मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता ६८ मीटर उंचीच्या शिडीची चार वाहने (टर्न टेबल लॅडर) येणार आहेत. याकरीता पालिकेच्या अग्निशमन दलाने निविदा मागवल्या आहेत. उंच शिडीची वाहने दाखल झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलामधील उंच शिड्यांची संख्या १२ होणार आहे. उद््वाहनाची सोय असलेल्या या शिडी वाहनांमुळे उंच इमारतीतील बचावकार्य करण्यास मदत होणार आहे.

मुंबईमध्ये ६० मजल्यांपेक्षाही जास्त उंचीच्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये आग लागल्यास अग्निशमनाचे काम करताना अग्निशमन दलातील जवानांना जीव धोक्यात घालावा लागतो. मुंबईतील गगनचुंबी इमारतींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आगीच्या घटनेदरम्यान बचावकार्य करता यावे याकरीता मुंबई अग्निशमन दलाने उंच शिडी असलेली वाहने घेतली आहेत. सध्या अग्निशमन दलाकडे अशी आठ उंच शिडी वाहने आहेत. आता आणखी चार वाहने लवकरच घेण्यात येणार आहेत. ४० मीटर उंचीचे एक शिडी वाहन, ३० मीटर उंचीची दोन शिडी वाहने, ६४ मीटर उंचीची दोन शिडी वाहने, ३७ मीटर उंचीची दोन वाहने आणि ५५ मीटर उंचीचे एका वाहन सध्या अग्निशमन दलाकडे आहे. आता लवकरच ताफ्यात ६८ मीटर उंच शिडीची आणखी चार वाहने दाखल होणार आहेत. उंच इमारतीतील आग विझवणे, इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे आदी कामांसाठी उंच शिडीचा वापर करण्यात येतो.

हेही वाचा : मुंबई : व्ही. एन. देसाई रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रुग्णांची गैरसोय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर उंच इमारतींची संख्याही वाढत आहे. अशा इमारतीत आग लागल्यास या उंच शिडीचा वापर केला जोता. आग विझवण्यासाठी व बचावकार्य करण्यासाठी या शिडीचा वापर करण्यात येतो. इमारतींची संख्या वाढत असल्यामुळे उंच शिडी वाहनांची संख्याही वाढवण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली. ६८ मीटर उंचीची शिडी २१ मजल्यापेक्षाही उंच जाते. गगनचुंबी इमारतीत अग्निरोधक यंत्रणा कार्यरत असल्यास आग विझवण्याचे काम सोपे जाते. मात्र एखाद्या इमारतीत ही यंत्रणा कार्यरत नसेल तर शिडीचा उपयोग होतो. तसेच बचावकार्य करण्यासाठी या शिडीचा विशेषत: उपयोग होतो. नव्याने निविदा मागवण्यात आलेल्या या शिडी वाहनात उदवाहनाचीही सोय आहे. त्यामुळे बचावकार्य वेगाने होऊ शकणार आहे.