मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयातील परिचारिकांना महिन्याला आठ सुट्ट्या मिळत असून कूपर, कस्तुरबा आणि क्षयरोग रुग्णालयासह उपनगरांतील रुग्णालयात कार्यरत परिचारिकांना सहा दिवस सुट्ट्या मिळत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने परिचारिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. यासंदर्भात परिचारिकांच्या चार संघटनांची नुकतीच उपायुक्त शरद उघडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व परिचारिकांना आठ सुट्ट्या लागू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तसेच याबाबत काही बैठका झाल्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास साडेतीन हजार परिचारिकांना आठ दिवस सुट्ट्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना महिन्याला आठ सुट्या देण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला होता. या निर्णयाची अमलबजावणी केईएम, शीव व नायर रुग्णालयामध्येच करण्यात आली, तर महापालिकेच्या कूपर, कस्तुरबा आणि क्षयरोग रुग्णालयांसह उपनगरांतील रुग्णालयात या नियमाची अमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. काही महिन्यांपूर्वी केईएम, शीव व नायर रुग्णालयांमधील परिचारिकांना महिन्याला आठ दिवस मिळणाऱ्या सुट्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे परिचारिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या संदर्भात परिचारिकांच्या चारही संघटनानी गुरूवारी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद उघडे यांच्या अध्यक्षतेखाली नायर दंत महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीमध्ये परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या देण्याच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने परिचारिकांचे मुद्दे मांडले.

मुंबई महानगरपालिका उपायुक्त शरद उघडे यांनी संघटनांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवत सर्व परिचारिकांना महिन्याला आठ दिवस सुट्या देण्याबाबत बैठका घेऊन चर्चा करणे अपेक्षित असल्याचे सांगितले. या बैठकांमध्ये अंतिम निर्णय घेऊन वैद्यकीय महाविद्यालयांसह, उपनगरीय रुग्णालये आणि विशेष रुग्णालयातील परिचारिकांना महिन्याला आठ दिवस सुटी देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या

  • केईएम, शीव व नायर रुग्णालतील परिचारिकांच्या ८ सुट्यांसंदर्भातील प्रशासनाने काढलेले परिपत्रक बेकायदेशी असून, ते मागे घेण्यात यावे.
  • सर्व रुग्णालयातील परिचारिकांना आठ सुट्या त्वरित लागू कराव्या.
  • ⁠उपनगरीय, शिवडी टी. बी. व कस्तुरबा रुग्णालयांतील परिचारिकांना महिन्याला सहा सुट्या मिळत असल्याने त्यांना मागील तीन वर्षांच्या प्रत्येक महिन्याच्या वाढीव दोन सुट्यांप्रमाणे ४८ ते ७२ दिवसाची विशेष रजा द्यावी.