मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रभादेवी पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी (२५ एप्रिल) रात्री ९ वाजता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. मात्र हा पूल बंद करण्यापूर्वी काही तास आधी प्रभादेवीतील स्थानिक रहिवासी आणि प्रकल्पबाधित अचानक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्ता रोधक आणि पूल बंद करण्याबाबतचे फलक फेकून दिले. प्रभादेवी पुलावर जोरदार आंदोलन करीत पूल बंद करण्यास विरोध केला. बराच वेळ प्रभादेवी पुलावर गोंधळ सुरू होता. पोलिसांनी आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न केला. पण रात्री उशिरापर्यंत पुलावर गोंधळ सुरूच होता.

अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रभादेवी पुलावरुन जाणार आहे. त्यानुसार एमएमआरडीए सध्याचा पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधणार आहे. या पुलाच्या एका स्तरावरून स्थानिक वाहतुकीची ये-जा होणार आहे. तर दुसऱ्या स्तरावरुन अटल सेतूकडे जाता-येता येणार आहे. या द्विस्तरीय पुलाच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी एमएमआरडीए मागील कित्येक महिने वाहतूक पोलिसांकडे ‘ना हकरत’ प्रमाणपत्र मिळविण्याकरीता पाठपुरावा करीत होती. अखेर वाहतूक पोलिसांनी पूल बंद करून पाडकाम करण्यासाठी आणि नवीन पुलाचे बांधकाम करण्यासाठी नुकतेच एमएमआरडीएला ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी बंद करून एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात येणार होता.

मात्र शुक्रवारी रात्री प्रभादेवीतील स्थानिक रहिवासी आणि उन्नत रस्ता प्रकल्पातील प्रकल्पबाधित रस्त्यावर उतरले. त्यांनी पूल बंद करण्यास जोरदार विरोध केला. काही वेळातच मोठ्या संख्येने आंदोलक पुलाजवळ जमा झाले आणि त्यांनी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी न लावता पूल कसा बंद केला जात आहोत, असा प्रश्न विचारत पूल बंद करण्यास विरोध केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी रात्री ९ वाजता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. परंतु रात्री ९ वाजल्यानंतरही आंदोलक पुलाजवळच होते. याविषयी वाहतूक पोलिसांना विचारले असता त्यांनी पूल बंद करण्याचे काम एमएमआरडीएचे आहे. याबाबत विचारणा केली असता एमएमआरडीएकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.