मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील सर्वच मेट्रो स्थानकांवर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे चार डब्यांची मेट्रो गाडी अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे चार डब्यांची मेट्रो गाडी सहा डब्यांची करण्याची मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे. लवकरच प्रवाशांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांचे डबे वाढवून सहा डबे करण्याबाबतचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे. त्यानुसार इंडिया डेब्ट रिझोल्युशन कंपनी लिमिटेडमार्फत नॅशनल ॲसेट रिक्स्ट्रक्शन कंपनीकडे (एनएआरसीएल) प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास ‘मेट्रो १’वर सहा डब्यांची मेट्रो धावेल आणि गर्दी नियंत्रणात येईल.

मुंबईतील पहिली मेट्रो अशी ओळख असलेली ‘मेट्रो १’ २०१४ पासून वाहतूक सेवेत आहे. ही मेट्रो कार्यान्वित झाल्यापासून चार डब्यांची आहे. सुरुवातीला या मेट्रोला मुंबईकरांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर वा मेट्रो गाड्यांमध्ये गर्दी दिसत नव्हती. मात्र हळूहळू ‘मेट्रो १’ला प्रतिसाद वाढत गेला आणि आजघडीला ‘मेट्रो १’मधून दिवसाला पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. गर्दीच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी घाटकोपर, अंधेरीसह सर्वच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.

चार डब्यांच्या मेट्रो गाडीची क्षमता एका वेळी १७५० हून अधिक प्रवाशांना सामावून घेण्याइतकी नाही. त्यामुळे मेट्रो डबे वाढून सहा डब्यांची मेट्रो गाडी करण्याची मागणी काही वर्षांपासून प्रवाशांकडून करण्यात येत होती. तर एमएमओपीएलही यासाठी सकारात्मक होते. मात्र एमएमओपीएलकडून आतापर्यंत यादृष्टीने ठोस पाऊल उचलले जात नव्हते. आता मात्र एमएमओपीएलने डबे वाढविण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी डब्यांची संख्या वाढवून सहा डब्यांची मेट्रो गाडी करण्यासाठी इंडिया डेब्ट रिझोल्युशन कंपनी लिमिटेडच्यामार्फत नॅशनल ॲसेट रिक्स्ट्रक्शन कंपनीकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती एमएमओपीएलने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मेट्रो १’ मार्गिकेवर सध्या चार डब्यांची गाडी धावत असून या गाडीची एकूण क्षमता १७५० इतकी आहे. मात्र दोन डबे वाढल्यास प्रवाशी क्षमता २२५० इतकी होईल. सहा डब्यांची मेट्रो गाडी धावू लागल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, ‘मेट्रो १’ मार्गिकेवर १७०० कोटी रुपयांहून अधिक सहा बँकेचे कर्ज असून हे कर्ज फेडण्यास एमएमओसीएलने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे एमएमओसीएलविरोधात दिवाळीखोरीच्या कारवाईसाठी बँकांनी एनसीएलटीकडे धाव घेतली होती. तर बँकांनी ‘मेट्रो १’चे कर्ज एनएआरसीएल या सरकारी कंपनीला विकले आहे. त्यामुळे आता एमएमओसीएलने एनएआरसीएलकडे अतिरिक्त डबे खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावास एनएआरसीएलसह बँकांची परवानगी मिळाली तरच डबे खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावास कधी मंजुरी कधी मिळते याकडे एमएमओपीएल आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.