मुंबई : मानखुर्द आणि दहिसर येथे अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार करण्यात आला असून या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. मानखुर्द येथे सात वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या २७ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली.
आरोपीने शुक्रवारी पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. हा प्रकार पीडित मुलीच्या बहिणीला समजताच तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७६ व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसऱ्या घटनेत दहिसर येथे १० वर्षांची मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपी शुक्रवारी तिच्या घरी आला. त्याने तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी एमएचबी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांंनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७६ सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून ३० वर्षीय आरोपीला अटक केली. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलीस मोबाइल व्हॅन घटनास्थळी पोहोचल्या व तेथून आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ
मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्याअंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे.
२०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. २०२४ मध्ये या प्रमाणात घट झाली असून २०२४ मध्ये हे प्रमाण ९६ टक्के होते. याशिवाय विनयभंग व छेडछाड-अश्लील शेरेबाजी या गुन्ह्यांच्या उकल होण्याचे प्रमाणही अनुक्रमे १०० टक्क्यांवरून ९७ टक्के व ९६ टक्क्यांवरून ९१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. अल्पवयीन मुलांविरोधातील अत्याचाराच्या घडनांमध्ये बहुसंख्य आरोपी परिचित व्यक्त आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले होते.