मुंबई : विविध कारणांमुळे महानगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याचे सत्र सुरूच असून न्यू माहीम शाळेच्या मुद्द्यामुळे बंद शाळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईत गेल्या तीन वर्षात विविध माध्यमांच्या २८ शाळा बंद किंवा समायोजित झाल्याचे समोर आले आहे. त्यात सर्वाधिक म्हणजेच १७ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. तसेच, अन्य माध्यमांच्या शाळांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचवेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढल्याचे दिसते आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत शालेय दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळांमधील पायाभूत व अन्य सुविधांमुळे आणि महत्वाचे म्हणजे खासगी शाळांच्या न परवडणाऱया शुल्कामुळे अनेक पालकांचा महापालिकेच्या शाळांकडे कल वाढत आहे. मात्र, असे असले तरीही शाळांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांची कमतरता, रखडलेली पुनर्बांधणी, पुरेशा देखभालीचा अभाव आदी विविध कारणांमुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या संख्या कमी होत आहेत.

काही महिन्यांपूर्वी भांडुपमध्ये पासपोली मराठी शाळा क्र. २ आणि खिंडीपाडा मनपा मराठी शाळा बंद झाल्याचे समोर आले होते. त्यांनतर कुलाबा येथील पालिका शाळाही बंद झाली. त्यामुळे शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. माहीममधील मोरी मार्गावरील पालिकेची शाळा काही पुनर्बांधणीसाठी काही वर्षांपूर्वी तोडण्यात आली होती. मात्र, अद्याप तिच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. अशातच न्यू माहीम शाळेची इमारत अतिधोकायक असल्याचे पालिकेने घोषित केले असून लवकरच शाळेचे तोडकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे तोडलेल्या शाळेच्या इमारतींची पुनर्बांधणी करण्याऐवजी शाळा तोडण्याचा घाट पालिकेने सुरू केल्याचा आरोप होऊ लागला आहे.

आकडेवारी काय सांगते?

महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक मिळून शाळांची एकूण संख्या २०२१ – २२ मध्ये ११४६ इतकी होती. मात्र, २०२४-२५ मध्ये ती संख्या १११८ झाली. म्हणजेच तीन वर्षात २८ शाळा कमी झाल्या. त्यात सर्वाधिक म्हणजेच १७ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. तर, हिंदी आणि उर्दू शाळांमध्ये प्रत्येकी सहाने घट झाली. सद्यस्थितीत हिंदी माध्यमाच्या २१६, तर उर्दू माध्यमाच्या १८६ शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, या शाळांच्या संख्येत ६ ने घट झाली असली तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ६ ने वाढ झाली आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या दरम्यान, २०२१ -२२ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या ५४ शाळांची संख्या आता ६० वर पोहोचली आहे. या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, त्याचबरोबर शिक्षकांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. २०२१ मध्ये २९२८२५ विद्यार्थ्यांमागे ९७५५ शिक्षक होते. मात्र, २०२४-२५ मध्ये ३१०४२६ विद्यार्थ्यांना केवळ ८६३० शिक्षक अध्यापन करत आहेत.

मराठी माध्यमाच्या शाळांचे भविष्य टांगणीला

वर्ष २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात मुंबई महानगरपालिका मराठी माध्यमाच्या ३६८ शाळा चालवत होती. २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात शाळांची संख्या २५४ इतकी झाली आहे. म्हणजे ११ वर्षांत ११० हून अधिक शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचे भविष्य टांगणीला लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.