मुंबई : वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील पॅनोरामा इमारतीच्या बांधकामादरम्यान ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब ‘आवाज फाउंडेशन’च्या सुमायरा अब्दुलाली यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मुंबई व परिसरात आजवर झालेल्या आणि सुरू असलेल्या बहुमजली इमारतींच्या बांधकामांमुळे नागरिकांना ध्वनिप्रदूषण, वायू प्रदूषणासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ध्वनिरोधक यंत्रणा बसविणे, रात्रीच्या वेळी काम न करणे, सकाळी ६ ते सायंकाळपर्यंतच फक्त काम करणे, तसेच हवा स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा वापरणे आदी नियम लागू करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, वांद्रे पश्चिम येथे पॅनोरामा इमारतीच्या बांधकामादरम्यान ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाब सुमायरा अब्दुलाली यांनी एक्सच्या माध्यमातून दर्शनास आणून दिली आहे. शनिवारी सकाळी बांधकामस्थळी त्यांनी पाहणी केली. त्यावेळी तेथील आवाजाची पातळी ९६.९ डेसिबल इतकी होती. सुमायरा अब्दुलाली स्थानिक रहिवासी आहेत. या परिसरातील नागरिकांना दररोज या आवाजाचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : गरीबरथ एक्स्प्रेसला ‘एलएचबी’ डबे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या कामांसाठी वापर करण्यात येत असलेल्या यंत्रांचा खडखडाट, उडणारी धूळ यामुळे मुंबईकर बेजार झाले आहेत. तसेच बांधकामस्थळी मर्यादेपेक्षा जास्त आवाज होत असेल तर तेथे ‘नॉईस बॅरियर्स’ लावावेत, असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे बांधकामाच्या वेळी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणातून नागरिकांची काही अंशी सुटका होईल, असेही त्या म्हणाल्या.