मुंबई – दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दिंडोशी सत्र न्यायालयाने एका सुरक्षा रक्षकाला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कांदिवली येथे २०२० मध्ये ही घटना घडली होती. सुरक्षारक्षकाने इमारतीच्या लिफ्टमध्ये मुलीवर अत्याचार केला होता.

पीडित मुलगी घटनेच्या वेळी ती १० वर्षांची होती आणि पाचव्या इयत्तेत शिकत होती. कांदिवली येथील ती राहात असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने लिफ्ट मध्ये पीडितेचा विनयभंग केला होता. घटनेनंतर आरोपी वॉचमनला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याच्या विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

या प्रकरणाची सुनावणी दिंडोशी सत्र न्यायालयात झाली. पीडित मुलीने आरोपीची ओळख पटवली. न्यायालयात चार साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. सहाय्यक सरकारी वकील गीता मालणकर यांनी या गंभीर गुन्ह्यासाठी आरोपी सुरक्षा रक्षकाला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपी सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. युक्तीवाद करताना बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपी कुटुंब मध्य प्रदेशात राहतो. तो कामासाठी मुंबईत आला होता. त्याचे कुटुंब त्याच्यावर अवलंबून आहे, तो कुटुंबात एकटाच कमावता आहे असे नमूद केले. तसेच त्याच्यावर सौम्य कारवाई करण्याची विनंती केली. मात्र न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब यावरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश अश्विनी डी. लोखंडे यांनी सुरक्षा रक्षकाला दोषी ठरवले. हा पीडित मुलीसाठी निश्चितच मानसिक आघात होता, असे न्यायाधीशांनी सांगितले.

आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) आणि बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण, २०१२ (पोक्सो) च्या कलम ९,१० अंतर्गत तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५ (२) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास, त्याला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण, २०१२ च्या कलम ९, १० अंतर्गत पंधरा दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या दिवशी काय घडले होते?

६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी पीडितेच्या काकाला मुखपट्टी हवी होती. ती काकाला मुखपट्टी देऊन लिफ्टने घरी येत होती. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने लिफ्टमध्येच तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुलगी घरी आली आणि ऑनलाईन शिकवणी वर्गात उपस्थित राहिली. परंतु झालेल्या प्रकाराने ती खूप भेदरलेली होती. यापुढे खाली जाणार नाही असे तिने मावशीला सांगितले. तिच्या मावशीने याबाबत विचारणा केल्यानंतर तिने काय घडले ते सांगतले. या घटनेनंतर पळून जाणाऱ्या सुरक्षा रक्षकाला इमारतीमधील रहिवाशांनी पकडले. गुन्हेगार ३ वर्षांपासून सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.