मुंबई : स्थावर मालमत्ता क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी महारेरा नोंदणीसह महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. असे असतानाही, वारंवार संधी देऊनही प्रशिक्षण पत्र सादर न करणाऱ्या दलालांविरोधात अखेर महारेराने कठोर पाऊल उचलले आहे. अशा तब्बल २० हजार दलालांची महारेरा नोंदणी स्थगित केली आहे. आता या दलालांना दलाल म्हणून काम करता येणार नाही.

दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण, प्रशिक्षण वा कौशल्य घेणे बंधनकारक नाही. त्यामुळे कोणीही दलाल म्हणून काम करतात. अशा दलालांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते. अशा अनेक तक्रारी येत आहेत. नोंदणी स्थगित केलेल्या दलालांच्या माध्यमातून कोणतेही व्यवहार करू नये, असे आवाहन महारेराने ग्राहकांना केले आहे. दरम्यान, रेरा कायदा राज्यात लागू झाल्यापासून दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत ४७ हजार दलालांनी महारेराकडे नोंदणी केली आहे. नोंदणीनंतरही दलालांकडून ग्राहकांची फसवणूक सुरू आहे. तर कोणीही दलाल म्हणून काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महारेराने दलालांना महारेरा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२४ नंतर स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेराने विहित केलेले प्रशिक्षण पूर्ण करून, परीक्षा देऊन प्रमाणपत्र संकेतस्थळावर नोंदविल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही, असे महारेराने जाहीर केले आहे. दरम्यान, अनेक दलालांनी नोंदणी रद्द करण्याची विनंती महारेराकडे केली आहे.

हेही वाचा : बँकेच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलिसांची सायबर फसवणूक

कार्यपद्धती जाहीर

अनेक दलालांनी त्यांची नोंदणी रद्द करण्याची विनंती महारेराकडे केली आहे. नोंदणी रद्द करता यावी यासाठी महारेराने कार्यपद्धती जाहीर केली आहे. यासाठी संबंधितांनी महारेराचे संचालक यांच्याकडे dereg. agent@gmail. com या मेलवर विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. परवाना रद्द करण्याची परवानगी दिलेल्या दलालाबाबत काही तक्रार असल्यास त्याबाबत तक्रार करता येईल. तक्रारीच्या अनुषंगाने घेतलेला निर्णय संबंधित दलालाला बंधनकारक राहणार आहे, असे परिपत्रकही महारेराने जाहीर केले आहे.