मुंबई : मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकावर उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले असून मे महिन्याच्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. गेल्या २० वर्षांपासूनची विक्रोळीकरांची मागणी पूर्ण होत आहे. पण हा पूल सुरू झाल्यास या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विक्रोळीवासियांना एका नवीनच समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकावर मुंबई महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात पूर्व बाजूकडील, तसेच रेल्वे हद्दीतील काम, पश्चिम बाजूकडील चढ – उतार मार्ग आदींचा समावेश आहे. विक्रोळी पुलाचे पूर्वेकडील, तसेच रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. पश्चिमेकडील चढ – उतार मार्ग तयार आहे. पश्चिम बाजूला सेंट जोसेफ शाळेजवळ वळण आहे. त्या ठिकाणी पुलाचे ३ स्पॅनवरील काम शिल्लक आहे.

शाळा आणि रेल्वे स्थानक असे सातत्याने रहदारी असलेले परिसर जवळ असल्याने अतिशय दक्षता घेऊन मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने काम सुरू केले आहे. हे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार असून पावसाळ्यापूर्वी हा पूल सुरू करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे.

पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनचालकांची वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांपासून ५ किलो मीटरपर्यंतच्या परिघातील वाहनचालकांनाही या पुलाचा उपयोग होईल, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. हा पूल व्हावा अशी विक्रोळीवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार आता हा पूल लवकरच वाहतूक सेवेत दाखल होत आहे.

मात्र या पुलामुळे आता नवीन समस्या या परिसरात लोकांना भेडसावण्याची शक्यता आहे. टागोर नगर, कन्नमवार नगर, एलबीएस मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग येथे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती येथील रहिवासी व्यक्त करीत आहेत. याबाबत ‘मी विक्रोळीकर’ या संघटनेचे गणेश शेट्टी यांनी सांगितले की, टागोर नगरमधील अंतर्गत रस्ते अत्यंत अरुंद आहेत व पुलाच्या वापरामुळे वाहतुकीचा भार अनेक पटींनी वाढणार आहे.

सध्या घाटकोपर आणि कंजूरमार्गकडे जाणारी वाहने सेवा रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. या वाहनांनी थेट उड्डाणपूल वापरल्यास मुख्य प्रवाहातील वाहतूक सुरळीत राहील. अन्यथा सेवा रस्ते आणि अन्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होईल. जर योग्य नियोजन वेळीच झाले नाही, तर पूल सुरू होताच विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व भागात प्रचंड वाहतूक कोंडी होईल, त्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल.

रहिवाशांच्या सूचना

घाटकोपर व कंजूरमार्गच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना उड्डाणपूल वापरणे सक्तीचे करावे. सेवा रस्त्यांचा वापर फक्त टागोर नगर व कन्नमवार नगरमध्ये जाणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी मर्यादित करावा. उड्डाणपूलाखाली डाव्या व उजव्या वळणाची सुविधा केवळ स्थानिक वाहतुकीसाठी राखावी. स्पष्ट सूचना फलक लावून व वाहतूक पोलीस नेमून योग्य नियमन करावे. टागोर नगर व परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.