मुंबई : देहविक्रीसाठी बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींची तस्करी करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर देहविक्री करण्यात येत असून देशाच्या विविध भागांतील गरजू तरुणींना फूस लावून, फसवून येथे आणले जाते. देशात घुसखोरी करणारे बांगलादेशी नागरिक यात सक्रिय आहेत. दलाल बांगलादेशातून मुलींना बेकायदेशीर मार्गाने भारतात आणून मुंबई आणि परिसरात देहविक्रीसाठी पाठवतात.
गेल्या काही दिवसात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी छापे घालून अल्पवयीन मुलींची सुटका केली. या मुली १५ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. दोन दिवसांपूर्वी नायगाव येथून एका १२ वर्षीय बांगला देशी अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली होती. तिला बांगला देशातून बेकायदेशीर मार्गाने कोलकातामध्ये आणून गुजराथ येथे नेण्यात आले होते. तेथे ३ महिन्यांत आपल्यावर तब्बल २०० जणांनी बलात्कार केल्याचे तिने जबाबात पोलिसांना सांगितले होते. जुलै महिन्यात मालाड मध्ये १५ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली होती. तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर बलात्कार करून वेश्याव्यसायात ढकलेले होते. मागील आठवड्यात काळाचौकी येथे छापा टाकून पोलिसांनी १५ वर्षांच्या मुलीची सुटका केली. तिला आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले होते.
बांगलादेशातून सर्वाधिक तस्करी
देहविक्रीसाठी सर्वाधिक महिला बांगलादेशातून आणल्या जातात. काही महिन्यांपूर्वी अनैतिक मानवी वाहतूक शाखेने एका अशोक दास नावाच्या बांगला देशी दलालाला अटक केली होती. तो बांगलादेशामधून मुलींची तस्करी करून त्यांना विरारमधील म्हाडाच्या इमारतीत ठेवत होता. तेथून तो त्यांना मुंबई आणि परिसरात पाठवत होता. मागील दोन वर्षांत त्याने बांगला देशातून ३०० मुली आणल्या होत्या. पोलिसांनी त्याच्या तावडीतून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली होती. या दलालांची साखळी देशभर पसरली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी बांगला देशी नागरिकांविरोधात मोहीम सुरू केली आहे.