मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रूझ – चेंबूर जोड रस्ता विस्तारीकरणाअंतर्गत कुर्ला – वाकोला आणि भारत डायमंड बोर्स – वाकोला उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. कुर्ला – वाकोला मार्गातील कुर्ला – कपाडिया नगर या २.५ किमी लांबीच्या, तर भारत डायमंड बोर्स – वाकोला उन्नत मार्गातील एमटीएनएल – कपाडिया नगर या १.१ किमी लांबीच्या टप्प्याचे शुक्रवारी लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्यांचे दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्याची तयारी एमएमआरडीएने सुरू केली आहे. मात्र एमएमआरडीएने अद्याप याबबात अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा >>>“या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केला”, पत्रकाराच्या हत्येनंतर जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्त्यावरून वेगात येणाऱ्या वाहनांना कुर्ला, वाकोला आणि बीकेसीतील वाहतूक कोंडीत अडकावे लागते. ही अडचण सोडविण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता विस्तारीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत कुर्ला – वाकोला आणि वाकोला – भारत डायमंड बोर्स असे दोन उन्नत मार्ग बांधण्यात येत आहेत. २०१६ मध्ये या कामास सुरुवात झाली असून हे काम २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम संथगतीने सुरू असून २०२३ उजाडले तरी हे काम पूर्ण झालेले नाही. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प रखडल्याचे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचले आहे.

हेही वाचा >>>मुंबई महानगरपालिकेचा ‘आरोग्यम् कुटुंबम्’ कार्यक्रम; वर्षभरात ४७ टक्के नागरिकांची करणार आरोग्य तपासणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने अखेर या प्रकल्पाच्या कामाला वेग दिला आहे. त्याचवेळी दोन्ही उन्नत मार्गातील एक-एक टप्पा फेब्रुवारी अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती नुकतीच एमएमआरडीएने न्यायालयात दिली आहे. आता प्रत्यक्ष दोन्ही मार्गातील पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यावेळी कुर्ला – कपाडीया नगर दरम्यानच्या २.५ किमी लांबीच्या आणि एमटीएनएल – कपाडीया नगर या १.१ किमी लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येण्याची शक्यता आहे. याविषयी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. मात्र एमएमआरडीए पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची तयारी करीत आहे. या दोन्ही मार्गिकेतील पहिला टप्पा शुक्रवारी सुरू झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली जाणार असून चेंबूर ते बीकेसी प्रवास सुसाट होणार आहे. दरम्यान, कांदिवली येथील आकुर्ली भुयारी मार्गाचेही लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तर कुर्ला – वाकोला आणि भारत डायमंड बोर्स – वाकोला असा पूर्ण उन्नत मार्ग जूनमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.