मुंबई : नियंत्रणात आलेला करोना संसर्ग आणि हटविण्यात आलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जून २०२२ या सहा महिन्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल एक कोटी ७० लाख प्रवाशांनी प्रवास केला. अन्य शहर, राज्य अथवा देशातून आलेले आणि मुंबईबाहेर गेलेल्या प्रवाशांचा त्यात समावेश आहे. २०२१ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत यात १३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जून २०२२ या कालावधीत सर्वाधिक प्रवाशांनी मे महिन्यात विमानतळावरून प्रवास केला आहे. शाळा, महाविद्यालयांना पडलेल्या सुट्टीत अनेकांनी पर्यटनस्थळी जाणे पसंत केले आहे. एक कोटी ७० लाखापैकी मेमध्ये तब्बल ४० लाख प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास केला होता. २१ मे २०२२ रोजी एक लाख २३ हजार ४४२ प्रवाशांनी विमानतळावर आगमन आणि उड्डाण केले होते. जूनमध्ये हीच संख्या आठ लाख ३० हजार इतकी होती. सहा महिन्यात एक कोटी ७० लाख प्रवाशांसाठी विमानाच्या एक लाख ३० हजार उड्डाण फेऱ्या झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये ९७ हजार ४७० उड्डाण फेऱ्या देशांतर्गत एक कोटी ३३ लाख प्रवाशांसाठी होत्या.