मुंबई : शासननिर्णयाप्रमाणे १ जुलैपासून महागाई भत्त्यात ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे. संबंधित महागाई भत्ता हे महानगरपालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना अनुज्ञेय असेल. मात्र, माध्यमिक शाळा संहितेनुसार वेतन अनुज्ञेय असणाऱ्या माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असणार नाही.
सुधारित महागाई भत्त्याची ऑक्टोबर या महिन्यासाठीची आकारणी, जुलै ते सप्टेंबर या महिन्यांच्या थकबाकीसह, संबंधित कर्मचाऱ्यांच्या, निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या ऑक्टोबरच्या मासिक वेतनपत्रकात देण्याबाबतची कार्यवाही मानव संसाधन विभागामार्फत करण्यात येणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करताना सुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन विचारात घेण्यात येणार आहे. विशेष भत्ता किंवा इतर कोणत्याही नावाने वेतनात समाविष्ट होणारी रक्कम विचारात घेण्यात येणार नाही. महागाई भत्त्याची रक्कम परिगणित करताना ५० पैसे किंवा त्याहून अधिक येणारी रक्कम पुढील रुपयात पूर्णाकित करण्यात येणार आहे.
दरम्यान, ५ – ७ व्या वेतन आयोगानुसार, महागाई भत्ता देय करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित परिपत्रकांमधील टीप-१ मध्ये नमूद असलेली बाब ‘तथापि, व्यवसायरोध भत्ता असल्यास सुधारित वेतन व व्यवसायरोध भत्ता यांच्या एकत्रित रकमेवर महागाई भत्ता आकारण्यात येण्याची बाब वगळण्यात आली आहे.
