मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ या मार्गावरील मेट्रो आता उशिरापर्यंत धावणार असून शनिवारपासून (६ ऑगस्ट) शेवटची गाडी रात्री ११ वाजून ४४ मिनिटांत सुटणार आहे. तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी शनिवारपासून ११ वाजून १९ मिनिटांत सुटेल, अशी माहिती मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून (एमएमओपीएल) देण्यात आली. 

 करोना साथीमुळे मेट्रो सेवेचा कालावधी आणि फेऱ्या कमी करण्यात आल्या. हा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर ‘एमएमओपीएल’ने टप्प्याटप्प्याने वेळ आणि फेऱ्या वाढविल्या. या साथीचे सर्व निर्बंध हटल्यानंतर ही प्रवासी सेवा पूर्ववत झाली असून सकाळी साडेसहा ते रात्री १२ वाजून ७ मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे.

 ‘एमएमओपीएल’ने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवापर्यंत घाटकोपरवरून रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी शेवटची गाडी सुटत होती.  मात्र शनिवारपासून रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी शेवटची गाडी सुटणार आहे. तसेच वर्सोव्यावरून रात्री ११ वाजता सुटणारी शेवटची गाडी रात्री ११ वाजून १९ मिनिटांत सुटणार आहे.

घाटकोपरवरून रात्री ११ वाजून ४४ मिनिटांत सुटणारी गाडी वर्सोवा स्थानकात रात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पोहचणार आहे. मात्र त्याच वेळी सकाळच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही. वेळापत्रकानुसार वर्सोवा आणि घाटकोपरवरून सकाळी ६.३० वाजता पहिली गाडी सुटणार आहे.

मेट्रो ३च्या चाचणीचा मार्ग अखेर मोकळा; उर्वरित चार डबे  मुंबईत दाखल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या मार्गिकेवरील आठ डब्यांच्या पहिल्या मेट्रो गाडीचे चार डबे मंगळवारी पहाटे मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर आता उर्वरित चार डबे शुक्रवारी पहाटे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये दाखल झाले. यामुळे या मार्गिकेवरील मेट्रो चाचणीचा मार्ग अखेर मोकळा झाला.  येत्या दोन दिवसांत मेट्रो गाडीच्या आठही डब्यांची जोडणी करण्यात येणार असून त्यानंतर तीन किमीपर्यंत गाडीची चाचणी घेण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो ३ चा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘एमएमआरसी’चे आहे. त्यासाठी सर्वप्रथम कारशेडचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार आरेत कारशेड बांधण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. तर आता मेट्रो गाडीची चाचणीही करण्यात येणार आहे.  दरम्यान, काही आठवडय़ांपासून आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथील कारखान्यातून मेट्रो गाडी मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार १७ जुलैला  चार डबे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.  ते मंगळवारी पहाट दाखल झाले. उर्वरित चार डबेही शुक्रवारी  दाखल झाले आहेत. येत्या दोन दिवसांत या डब्यांच्या गाडीची जोडणी करण्यात येणार असून तात्पुरती कारशेड (सारिपुत नगर) ते मरोळ नाका या दरम्यान तीन किमीच्या मार्गावर चाचणी घेण्यात येणार आहे, असे ‘एमएमआरसी’कडून सांगण्यात आले आहे.