गर्दी. मुंबईला गिळून टाकणारी गर्दी. ती वाढतेच आहे. पंधरवडय़ापूर्वी तर या गर्दीने २३ माणसे गिळली. चिरडली. पण ही गर्दी थांबायचे नाव नाही. ती वाढतेच आहे. ती घरांत आहे, रस्त्यांवर आहे. उपनगरी गाडय़ांमध्ये आहे आणि गाडय़ांचीसुद्धा गर्दी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे शहर सतत विस्तारतच चालले आहे. ते पूर्वी आडवे विस्तारत होते. आता उभे विस्तारत आहे. येथे टोलेजंग इमारती नावाच्या नव्या ‘परवडणाऱ्या झोपडपट्टय़ा’ म्हाडाच्या कृपेने होतच आहेत. आता तर मायबाप सरकारच्या कृपेने येथे दुमजली झोपडय़ाही अधिकृत होत आहेत. वस्ती वाढतेच आहे आणि हे काही आजचे नाही.

नोव्हेंबर, १८६२च्या ‘गॅझेट’मध्ये हीच तक्रार येऊन गेलेली आहे. त्यात लिहिले होते, ‘हल्ली एथें जाग्याचा सर्व प्रकारे संकोच होत चालला आहे, व लोकांस दुप्पट तिप्पट भाडें देऊन राहायास जागा सांपडत नाही.’ तेव्हा यावर उपाय काय करण्यात आला? तोच – ज्याचे मनसुबे आजही आपले सरकार रचत आहे – मुंबईचा विस्तार करण्याचा. मुंबईत राहण्यास जागा नाही, ‘सबब सरकारचा असा मनसुबा आहे कीं, ठाणे जिल्हा जो मुंबईलगत आहे तो तीस मिळवून ठाणें आणि मुंबई हीं एक शहर करावें. मग सरकारी हापिसांस ठाण्यास, कुरल्यास व साष्टींतील कोणत्याही स्थळीं जागा नेमून द्याव्या, ह्मणजे मुंबईचें स्थळ वाढून लोकांस जाग्याचा संकोच होणार नाहीं. व सरारास कलेक्टर, न्यायाधीश व खजानची हे निराळे ठेवण्याचा खर्च कमी होईल. परंतु हा मनोरथ केंव्हा सिद्धीस जाईल तें सांगवत नाहीं. असें केल्यानें कांही अंशी बरें होईल असें वाटतें.’

‘गॅझेट’मधील त्या लेखकाचे हे वाटणे रास्त होते. तेव्हाच्या इंग्रज सरकारचा मनसुबाही चांगलाच होता. परंतु तो काही पूर्णत्वास गेला नाही. म्हणजे मुंबई पसरली. ती ठाण्याच्या पारही गेली. नंतर दुसरी मुंबईही वसविण्यात आली. आता गेल्या कित्येक वर्षांपासून तिसऱ्या मुंबईचे घाटत आहे. पण म्हणून मुंबईवरचा भार कमी झाला आहे का? ही दुसरी आणि तिसरी मुंबईही जुन्या मुंबईच्याच बोकांडी बसलेली आहे. सरकारी हापिसे ठाण्यास, कुल्र्यास वगैरे ठिकाणी न्यावीत, हा १८६२ मधील विचार अजूनही विचाराधीनच आहे.

इंग्रज काळात कदाचित मुंबईतील गर्दी बाहेर हटविण्याची तेवढी तातडी वाटली नसावी. त्यामुळे मुंबईतील बेटांभोवतीचा समुद्र बुजवून जागा तयार करण्यात आल्या. तो विचारही १८६२च्या आगेमागेचा. त्याबाबतचा एक उल्लेख ‘मुंबईचे वर्णन’ या गोविंद माडगावकरांच्या पुस्तकात आढळतो, की ‘कांपाच्या मैदानाच्या पश्चिमेस कुलाब्याच्या आणि वालुकेश्वराच्या मध्यें जी सुमारें एक कोस लांब आणि दीड कोस रुंद खाडी आहे, तीस भर घालून तेथें नवें बंदर करून लोकांस राहायासाठीं जागा वाढवावी, असा कित्येकांचा मनसुबा आहे.’

मुंबईतील तेव्हाच्या ‘जाग्याच्या संकोचा’वर आणखी एक उपाय त्या काळात करण्यात आला. ‘सन १८६१ माहे आगष्ट महिन्यांत मुंबईतील बहुतेक व्यापारी व सरकारी हुद्देवाल्या गृहस्थांनी सरकारास असा अर्ज केला कीं, मुंबईत दिवसेंदिवस जाग्याचा फार संकोच होत चालल्यामुळें किल्ल्यांतील राहणारांस फार अडचण पडत्ये, तर किल्ल्याचे फक्त दक्षिण व पूर्व बाजूकडील तट कायम ठेवून बाकी सर्व मोडून त्याच्या भोंवताले पाण्याचे चर आहेत, ते बुजवून टाकून ही जागा कांपाच्या मैदानास मिळवावी, आणि ती लोकांस घरें, हपिसें व बंगले बांधायासाठीं फरोक्त करून टाकावी.’ या मागणीनुसार इंग्रज सरकारने मुंबईच्या किल्ल्याचा पश्चिमेकडील भाग मोडण्याचा ठरावही केला. त्याची तारीख होती २२ नोव्हेंबर १८६२. किल्ला मोडला. आता मुंबई ‘मोडण्या’ची वेळ आली आहे. गर्दी वाढते आहे. ‘जाग्याचा संकोच’ कायम आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incredible facts about mumbai city
First published on: 11-10-2017 at 03:55 IST