मुंबई जलवाहतुकीचा पहिला टप्पा दोन वर्षांत पूर्ण करणार

मुंबई जलवाहतुकीचा पहिला टप्पा दोन वर्षांत पूर्ण करण्याबरोबरच कोकणचा पर्यटन विकास साधण्यासाठी आणि सागरी पर्यटनासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. कोकणात एक लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असून त्यातून लाखभराहून अधिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी तीन हजार ५५ कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून आशियाई विकास बँकेकडून त्यासाठी निधी उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई व कोकणच्या विकासाबाबत विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन महामंडळाची घोषणा केली. कोकणात पर्यटनाच्या विकासासाठी प्रचंड वाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळांसाठी एकात्मिक विकास आराखडय़ाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ‘स्वदेश दर्शन’ योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काम केले जाणार आहे. पर्यटनाच्या विकास प्रकल्पांसाठी सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र (सीआरझेड) कायद्यातील अटी शिथिल केल्या जातील. सिंधुदुर्गमधील सीवर्ल्ड प्रकल्पातील काम युद्धपातळीवर पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भाऊचा धक्का ते मांडवा या जलवाहतुकीच्या निविदा या महिन्यात उघडल्या जातील आणि मे महिन्यात कंत्राट दिले जाईल. हे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाणार असून जलवाहतुकीचा दुसरा टप्पा तीन वर्षांत पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जैन इरिगेशन कंपनीचा कोकणात आंबा प्रकिया उद्योग उभारणीचा विचार असून प्रक्रिया उद्योगांना काही सवलती देण्याबाबतही राज्य शासन अनुकूल आहे. रत्नागिरी विमानतळाचा व्यावसायिक पद्धतीने वापर व्हावा, यासाठी पावले टाकली जाणार असून रात्रीच्या वेळीही विमाने उतरण्याची व्यवस्था केली जाईल.

  •  कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या २० किमी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी स्वतंत्र निविदा
  • देशातील सर्वात मोठी ग्रीन रिफायनरी कोकणात. पाच हजार एकर जमिनीवर हरित क्षेत्र विकसित करणार
  • पर्शियन जाळी असलेल्या बोटींनी १२ समुद्री मैलांपलीकडे मच्छीमारी करण्याच्या सूचना, केंद्राला प्रस्ताव पाठविणार
  • डॉ. आंबेडकरांच्या आंबवडे गावासाठी ४० कोटी रुपयांचा निधी. आंबवडे ते हरिहरेश्वर हाउसबोट, तर मुंबई गोवा महामार्ग ते आंबवडे गाव रस्ता विकसित करणार

टॅब खरेदीत गैरव्यवहार नाही :  महापालिका शाळांमधील मुलांना टॅब देण्याचा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आग्रह आहे. या टॅबच्या खरेदीमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाल्याच्या तक्रारी होत्या. मात्र त्यात तथ्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.