मुंबई : वाढते प्रदुषण तसेच दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्दी खोकल्याचा त्रास वाढत असताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविक औषधे परस्पर घेण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात थेट औषध दुकानदारांकडून तसेच इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्वउपचार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यातील बहुतेकजण स्वत:च्या मर्जीने अँटिबायोटिक्स घेत असून प्रतिजैविक औषधांचा चुकीचा वापर देशातील आरोग्य व्यवस्थेसाठी नवे संकट ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लास’ सर्वेक्षणानुसार भारतातील अनेक बॅक्टेरियावर अँटिबायोटिन्सचा प्रभाव झपाट्याने कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’ (एएमआर) हे केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक आरोग्य संकट बनत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बहुतेक प्रकरणात रुग्ण वैद्यकीय सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक घेतात. त्यातील अनेकजण काही जण औषधे अर्धवट थांबवतात. यामुळे जीवाणू मरत नाहीत, उलट अधिक शक्तिशाली बनतात. हीच भारतातील एएमआर वाढीची मुख्य कारणे असल्याचे केईएमचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. परिणामी पूर्वी वेळेत बरे होणारे टायफॉईड, न्यूमोनिया, मूत्रमार्ग संसर्ग आज लवकर बरे होताना दिसत नाहीत.अनेक बॅक्टेरिया नियमित औषधांना प्रतिसाद देत नाहीत. फार्मसीतून ओटीसी सहज मिळणारी औषधे परिस्थिती अधिकच बिकट करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार नवीन अँटिबायोटिक्स तयार होण्याचा वेग प्रतिकारक जीवाणूंच्या वाढीपेक्षा अत्यंत कमी आहे.
ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य व्हायरल आजारांवर लगेचच अँटिबायोटिक्स घेणे अयोग्य आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता सुरू केलेले आणि मध्येच थांबवलेले औषधांचे कोर्स बॅक्टेरियाला अधिक प्रतिरोधक बनवतात. परिणामीअशा रुग्णांवर पुढे हॉस्पिटलमधील उपचार अधिक अवघड होतात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.लहान शहरांतील रुग्णालयांमध्ये संक्रमण नियंत्रणाचे साधनसामग्री आणि प्रोटोकॉल अपुरे आहेत. हात स्वच्छतेचा अभाव, रुग्णांमध्ये अनावश्यक औषधांचा वापर आणि अँटिबायोटिकचे प्रोटोकॉल आधारित नियमन न पाळणे ही गंभीर समस्या आहे.
भारत सरकारने राष्ट्रीय अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स अॅक्शन प्लॅन (एनएपी-एएमआर) तयार केला आहे. याअंतर्गत रुग्णालयांमध्ये संसर्ग नियंत्रण समित्या स्थापन करणे, औषध विक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे विक्रीस बंदी घालणे यावर भर आहे. डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांना उत्तरदायी ठरवण्याची तरतूदही यात आहे.
भारत एएमआरविरुद्धच्या जागतिक सहकार्यात सक्रीय सहभागी आहे. नवीन अँटिबायोटिक संशोधन, जनजागृती आणि आरोग्य क्षेत्रातील शाश्वत धोरणांसाठी देश विविध आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर काम करीत आहे. यासाठी रुग्णांनीही स्वत:हून काही काळजी घेणे अपेक्षित आहे. केवळ बँक्टेरियस संसर्ग असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे तसेच औषधाचा पूर्ण कोर्स करणे आवश्यक आहे. थोडे बरे वाटते म्हणून मधेच औषध घेणे थांबविल्यास शरीरातील बँक्टेरिया प्रभावी बनतो. मुख्यता हाताची स्वच्छता हाही एक कळीचा मुद्दा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या व्हायरल संसर्गात स्वतःहून औषध खरेदी किंवा मित्रांच्या सल्ल्याने वापर करू नये.जर अँटिबायोटिक्सचा बिनधास्त वापर आज थांबवला नाही, तर उद्याचा काळ अधिक कठीण ठरेल. साधे संसर्गही जीवघेणे ठरतील. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घेणे, पूर्ण कोर्स पाळणे आणि स्वच्छतेची सवय लावणे हेच एएमआर संकटावरचे सर्वात प्रभावी औषध आहे.
