मुंबई : स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि व्यायामाचा अभाव अशा टाळता येणाऱ्या जीवनशैलीसंबंधी कारणांमुळे मूत्रपिंडाचा (किडनी) कर्करोग जगभरात गंभीर आरोग्यधोका बनत चालला आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार २०५० पर्यंत या आजाराची रुग्णसंख्या आणि मृत्यूदर दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. भारतातही मूत्रपिड रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून त्या तुलनेत मूत्रपिंड विकार तज्ज्ञांची संख्या व उपचारांची व्यवस्था अत्यंत कमी आहे.
आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेच्या (आयएआरसी) ‘ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी’तील आकडेवारीचा युरोप, अमेरिका आणि ब्रिटनमधील संशोधकांनी अभ्यास केला. ‘युरोपियन यूरोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध निष्कर्षांनुसार २०२२ मध्ये जगभरात ४.३४ लाख नवीन मूत्रपिंड कर्करोग रुग्ण नोंदले गेले तर १.५५ लाखांहून अधिक मृत्यू झाले. हाच वेग कायम राहिल्यास कायम राहिल्यास २०५० पर्यंत नवीन रुग्णसंख्या तब्बल ७.४५ लाखांवर (७२ टक्के वाढ) व मृत्यूंची संख्या ३.०४ लाखांवर (९६ टक्के वाढ) जाण्याचा अंदाज आहे.
तज्ज्ञांच्या मते, भौगोलिक व लिंगानुसार रुग्णसंख्या व मृत्यूदरात मोठे फरक आहेत. निदानानंतरच्या पाच वर्षांत जगणाऱ्यांचे प्रमाण ४० ते ७५ टक्क्यांदरम्यान आहे.यात श्रीमंत देशांमध्ये नियमित तपासण्या व शस्त्रक्रिया-किरणोपचाराच्या व्यवस्थेमुळे रुग्णांचे जीवनामान सुधारून जगण्याचे प्रमाण जास्त आहे.
सुमारे ५ ते ८ टक्के मूत्रपिंड कर्करोग रुग्ण हे अनुवंशिक कारणांमुळे असतात. मात्र निम्म्याहून अधिक प्रकरणे स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, जुनाट मूत्रपिंड विकार, धूम्रपान, पर्यावरणीय घटक व व्यायामाचा अभाव अशा टाळता येणाऱ्या कारणांशी संबंधित असल्याचे संशोधन स्पष्ट करते. भारतात प्रामुख्याने मदुमेह व उच्च रक्तदाब हे मूत्रपिंड विकाराला आमंत्रित करताना दिसतात. मात्र याबाबत शासकीय तसेच वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती नसल्यामुळे एकतर मधुमेह व रक्तदाब असल्याचे निदान उशीराने होते. तसेच निदान झाल्यानंतरही यातून निर्माण होणाऱ्या आजारांविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे बहुतेक रुग्ण घेताना दिसत नाही.वजन, रक्तदाब व रक्तशर्करेवर नियंत्रण ठेवणे आणि विशेषतः धूम्रपान थांबवणे या जीवनशैलीतील बदलांमुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
भारतातील स्थिती चिंताजनक
भारतात दरवर्षी सुमारे १६ ते १७ हजार नवीन मूत्रपिंड कर्करोग प्रकरणे नोंदवली जातात. पुरुषांमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे सुमारे दोन आणि महिलांमध्ये एक असा प्रादुर्भाव आहे. देशात लठ्ठपणा, उच्च रक्तदाब व मधुमेह वाढत असल्याने आणि निदानास उशीर होत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे. भारतीय आरोग्य यंत्रणेमध्ये वेळेवर तपासण्या, उच्च दर्जाचे उपचार आणि ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करणे या गोष्टींवर भर दिल्यास रुग्णांचे आयुष्य वाचवता येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्था (नोटो) च्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात दोन लाखांहून अधिक रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणासाठी, तर ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण यकृतासाठी प्रतीक्षेत आहेत. त्याचप्रमाणे ८ ते १० हजार रुग्ण हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी, आणि सुमारे १,५०० रुग्ण फुफ्फुसांसाठी तातडीने अवयवय मिळण्याची वाट पाहत आहेत.एकट्या मुंबईचा विचार करता ४००० किडनी रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
‘द लॅन्सेट’चा इशारा
नुकत्याच ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक विश्लेषणानुसार, येत्या २५ वर्षांत सर्व प्रकारच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ७५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. जगातील ४० टक्के कर्करोग मृत्यू हे तंबाखूचे सेवन, अपौष्टिक आहार, जास्त रक्तशर्करा अशा ४४ टाळता येणाऱ्या जोखीम घटकांशी संबंधित असल्याने प्रतिबंधासाठी मोठी संधी असल्याचे या अभ्यासात स्पष्ट केले आहे.जीवनशैलीतील बदल, जनजागृती आणि नियमित तपासणी या उपाययोजना वेळेत राबवल्यास मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा वाढता धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.