मुंबई : आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये यंदा ‘डिफेन्स सिम्पोजियम २.०’ चे आयोजन करण्यात येत आहे. त्यात देशातील आजी माजी लष्कर प्रमुख एकत्र येणार आहेत. आशियातील सर्वात मोठा विज्ञान व तंत्रज्ञान महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि संरक्षण क्षेत्रातील जिज्ञासूंना ऐतिहासिक अनुभव मिळणार आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची उपस्थिती टेकफेस्टमधील सिम्पोजियमचे प्रमुख आकर्षण आहे. देशातील सर्वात वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि इंटिग्रेटेड थिएटर कमांड्सचे शिल्पकार म्हणून ओळखलेले जाणारे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान टेकफेस्टमध्ये उपस्थित राहणार आहेत.
संरक्षण क्षेत्रातील त्यांची धोरणात्मक दृष्टी, कार्यक्षम नेतृत्व आणि राष्ट्रीय सुरक्षेतील परिवर्तन याबाबत ते विचार मांडणार आहेत. त्यांच्यासह भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचे माजी प्रमुखही सहभागी होणार आहेत. २९ वे निवृत्त लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, २५ वे निवृत्त नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आणि २७ वे निवृत्त हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.
या चारही नेत्यांनी आपल्या दशकभराच्या अनुभवातून आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून भारताची संरक्षण व्यवस्था घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या सत्रांमध्ये भारताच्या बदलत्या लष्करी प्राधान्यक्रमांचा आढावा, संयुक्त दलांची समन्वयाची भूमिका, आधुनिक युद्धशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षेत तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका यावर चर्चा होणार आहे. हा उपक्रम देशातील संरक्षण नेतृत्वाचे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी चुकवू नये असा अनुभव ठरणार आहे.
‘डिफेन्स सिम्पोजियम २.०’ हा कार्यक्रम २२ ते २४ डिसेंबर २०२५ दरम्यान आयआयटी मुंबईच्या आवारात होणार आहे. नोंदणीसाठी techfest.org या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश मोफत आहे.
