मुंबई : भारतातील संसर्गजन्य रोगांवरील नियंत्रणासाठी आता नव्या युगाची सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आसीएमआर) कडून टीबी (क्षयरोग), मलेरिया आणि टायफॉईडसाठी स्वदेशी लसींच्या विकासावर मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, या लसी लवकरच प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लसीमुळे देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल घडवण्याची शक्यता असून, यामुळे लाखो नागरिकांचे प्राण वाचू शकतील.

दरवर्षी भारतात लाखो नागरिकांना मलेरियाचा संसर्ग होतो. टायफॉईडमुळेही अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. तर टीबीसारखा दीर्घकालीन आजार अजूनही भारतासाठी मोठी सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. २०२३ मध्ये भारतात तब्बल २४ लाखांहून अधिक टीबी रुग्णांची नोंद झाली तर तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. टायफॉईडचे रुग्ण ४० लाखांच्या आसपास आहेत. मलेरियाचेही लाखो रुग्ण देशात सापडत असतात. अशा परिस्थितीत या आजारांवर स्वदेशी लसींचा विकास ही मोठी सकारात्मक घडामोड ठरते.

आयसीएमआरकडून तीन वेगवेगळ्या टीबी लसींची प्रगती अंतिम टप्प्यात असून, पहिली म्हणजे ‘रिकॉम्बिनंट बीसीजी व्हॅक्सिन’ ही पारंपरिक बीसीजी लसीपेक्षा अधिक प्रतिकारशक्ती निर्माण करणारी आहे. ती सध्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीत आहे आणि मंजुरीची वाट पाहत आहे. दुसरी लस ही ‘हीट-किल्ड बॅक्टेरियल’ स्वरूपाची असून ती प्रौढांमध्ये प्रभावी ठरत आहे. तीही उशिराच्या चाचणी टप्प्यात आहे. तिसरी लस ‘लाईव्ह अॅटन्युएटेड’ टीबी लस असून, ती कमकुवत टीबी जीवाणूंवर आधारित आहे. प्रामुख्याने बीसीजीला एक पर्याय म्हणून समोर येत आहे.

मलेरियासाठी आयसीएमआरने ॲडफेलिसी व्हॅक्स नावाची रीकॉम्बिनंट किमेरिक लस विकसित केली आहे. ही लस सध्या प्री-क्लिनिकल चाचणीत असून प्रतिकारशक्ती आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत ती सकारात्मक सिद्ध झाली आहे. मात्र अद्याप मानवी चाचण्या सुरू व्हायच्या असल्याने ही लस प्रत्यक्ष वापरासाठी काही वर्षे दूर आहे. दरम्यान, टायफॉईड आणि एचपीव्ही या दोन लसी खाजगी क्षेत्रात आधीपासूनच उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा सार्वत्रिक लसीकरण योजनेत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने टायफॉईडवरील लसीकरणासाठी मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये दुसऱ्या टप्प्याचे टायफॉईड सर्व्हेक्षण सुरू केले आहे. हे सर्व्हेक्षण सध्या सुरू असून लवकरच निष्कर्ष हाती येणार आहेत.

स्वदेशी लशीसाठी निर्णायक पाऊल

एचपीव्ही लसीबाबतही आयसीएमआरने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, त्यांनी भारतातील पहिल्या स्वदेशी एचपीव्ही लसीची चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी सध्या आयात केलेल्या एचपीव्ही लशीच्या तुलनेत सुरू असून, दोन्ही लसी लवकरच मोठ्या प्रमाणावर वापरासाठी आणल्या जाण्याची शक्यता आहे. एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा गर्भाशयाच्या कर्करोगाचा मुख्य कारणीभूत घटक आहे. देशात दरवर्षी सुमारे ७०,००० महिलांचा मृत्यू गर्भाशयाच्या कर्करोगामुळे (सर्व्हायकल कॅन्सर) होतो.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टायफॉईड व मलेरियासारखे काही आजार स्वच्छता व व्यवस्थापनाने नियंत्रित करता येऊ शकतात. मात्र आपल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अजूनही खूप दुर्बल आहेत. अशा वेळी लसी हाच एकमेव ठोस उपाय ठरतो.या लसींच्या विकासामुळे भारताला केवळ आत्मनिर्भर होण्याची दिशा मिळणार नाही, तर निर्यातक्षम लसींच्या माध्यमातून जागतिक आरोग्य क्षेत्रातही भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हे लसीकरण योजनांचे यश केवळ रोगप्रतिबंधक उपाय म्हणून नव्हे, तर आरोग्याच्या सार्वत्रिक हक्काच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरेल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि आयसीएमआरने घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत होत असून, लवकरच हे प्रयत्न प्रत्यक्ष परिणामकारक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.