मुंबई : दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या आणि केवळ भारतातच आढळणाऱ्या जेर्डन कोर्सर या पक्ष्याची नोंद तब्बल १६ वर्षांनतर पुन्हा करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशमधील श्री लंकमल्लेश्वर अभयारण्याच्या बाहेरील परिसरात नुकत्याच झालेल्या पक्षीनिरिक्षण मोहिमेदरम्यान हा पक्षी आढळला आहे. दरम्यान, पक्षी निरिक्षण करणाऱ्या चमूमध्ये महाराष्ट्रातील पक्षी निरिक्षकाचाही समावेश होता.
या प्रजातीची नोंद १६ वर्षांपूर्वी लंकमल्लेश्वरच्या डोंगराळ पट्ट्यात नोंदविण्यात आली होती. त्यानंतर या परिसरात या पक्ष्याचा ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे ही नोंद जैवविविधतेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. पक्षी निरक्षकांच्या मते, जेर्डन कोर्सर हा पक्षी क्वचितच नजरेस पडतो. त्यामुळे ही नोंद पुढील संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, १९०० मध्ये या पक्ष्याचा समावेश नामशेष पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला होता. पक्षीनिरिक्षक आदेश शिवकर, शशांक दळवी , प्रणव, हरीश थंगराज आणि रोनिथ यांनी लंकमल्लेश्वर अभयारण्याच्या बाहेरील परिसरात २४ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास या पक्ष्याचा आवाज ध्वनिमुद्रित करण्यात पक्षीनिरिक्षकांना यश मिळाले. या परिसरात तब्बल १६ वर्षांनी जेर्डन कोर्सरची नोंद करण्यात आली आहे.
जेर्डन विषयी
जेर्डन कोर्सर हा प्रॅटिनकोल आणि कोर्सर कुटुंबातील ग्लेओलिडेशी संबंधित निशाचर पक्षी आहे. या पक्ष्याची १८४८ मध्ये निसर्गशास्त्रज्ञ थॉमस सी. जेर्डन यांनी नोंद केली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची ध्वनिक नोंद करण्यात आली आहे. हा पक्षी दक्षिण भारतात प्रामुख्याने आढळतो. त्याची भौगोलिक श्रेणी मर्यादित आहे. सिरोंचा जवळील गोदावेरी नदीच्या खोऱ्यातील कडप्पा आणि अनंतपूर भागातून आहे. हा पक्षी सायंकाळी आणि रात्री सक्रिय असते. दुर्मीळ पक्षी असल्याने, त्याच्या वर्तनाबद्दल आणि घरट्यांबद्दल अद्याप काहीही माहिती नाही.
८० वर्षांहून अधिक काळ नामशेष
१९व्या शतकाच्या मध्यात त्याची प्रथम नोंद झाली त्यानंतर ८० वर्षांहून अधिक काळ हा पक्षी नामशेष मानला गेला होता, जोपर्यंत १९८६ मध्ये आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात त्याचा शोध लागला नव्हता.