शाळेत मधल्या सुटीची घंटा घणघणली की जशी सर्व मुले डबे खाण्यासाठी एकत्र जमतात त्याप्रमाणेच फिश टँकमधील मासेही घंटानाद ऐकून जेवणासाठी एकत्र जमू शकतात.. विविध रसायनांचा वापर करून क्रिस्टल गार्डन तयार करता येऊ शकते.. मुगाच्या डीएनची उकल करून धान्याचा अभ्यास होऊ शकतो.. असे विविध प्रयोग सध्या प्रयोग नेहरू विज्ञान केंद्रात सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रयोग कुणी वैज्ञानिक किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी करत नसून शाळकरी विद्यार्थी हे प्रयोग करत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये अमाप कल्पनाशक्ती असते. त्याला साधनसामग्री आणि मार्गदर्शनाची जोड मिळाली तर ते खूप काही साकारू शकतात. या संकल्पनेतून केंद्र सरकारने ‘१०० इनोव्हेशन हब’ उभारण्यास सुरुवात केली आहे. यातील पाचव्या हबचे उद्घाटन मुंबईत सोमवारी ‘राष्ट्रीय इनोव्हेशन परिषदे’चे सदस्य आर. गोपालकृष्णन यांच्या हस्ते झाले.
या केंद्रात विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक संकल्पानांवर काम करण्यासाठी मार्गदर्शन आणि साहित्य सामग्री उपलब्ध करून दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना केंद्रात केलेल्या संशोधनापेक्षा अधिक आधुनिक स्तरावरील संशोधन करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना टाटा मूलभूत संशोधन संस्थेतही पुढे संधी मिळू शकते, अशी माहिती नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेणेद यांनी दिली. या इनोव्हेशन हबमध्ये एकावेळी ३० विद्यार्थी अभ्यास
करू शकतात.
या ठिकाणी इनोव्हेशन रिसोर्स सेंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांला इंटरनेट, ई-जर्नल्स, पुस्तके आदी माहितीसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. इनोव्हेटिव्ह लॅबमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्यासाठी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर रोबोटिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळाही स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय या केंद्रामध्ये ‘तोड फोड जोड’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी चांगल्या वस्तू तोडून त्याचा अभ्यास करून त्या पूर्ववत करून ठेवायच्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी स्वस्तातील कच्चा माल वापरून विविध वैज्ञानिक खेळणी तयार करणे, इंटरॅक्टिव्ह नमुने तयार करणे यासाठी ‘कबाड से जुगाड’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या हबमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, जीवशास्त्र, रोबोटिक्स आदी क्षेत्रांत मूलभूत आणि अत्याधुनिक संशोधन करता येणार आहे.