IndiGo Aircraft Touches Runway at Mumbai Airport: मुंबईमध्ये शुक्रवार पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट दिलेला आहे. खराब हवामानाचा फटका आता विमान सेवेला बसण्याची शक्यता आहे. शनिवारी पहाटे इंडिगोच्या विमानाचा मागच्या भागाचा धावपट्टीला स्पर्श झाल्याची माहिती मिळत आहे. इंडिगो एअरबस ए३२१ या विमानाचा भाग कमी उंचीवर असताना विमानतळावर टेकला. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर प्रकरणाची त्यांनी दखल घेतली असून याची औपचारिक चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केल्यानंतर पहाटे ३ वाजल्यानंतर सुरक्षितपणे लँडिग पार पडले. मागच्या दोन वर्षांत इंडिगोच्या विमानाच्या मागच्या भागाचा धावपट्टीला स्पर्श होण्याचा हा सातवा प्रसंग असून डीजीसीएने याबाबत कंपनीकडे विचारणा केलेली आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “१६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील खराब हवामानामुळे इंडिगो एअरबस ए३२१ विमान उतरताना कमी उंचीवर असताना त्याच्या मागच्या भागाचा धावपट्टीला स्पर्श झाला. त्यानंतर विमानाने दुसरा मार्ग अवलंबला आणि दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग करण्यात आले. स्टँडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे विमान पुन्हा कार्यान्वित करण्यापूर्वी आवश्यक तपासणी आणि दुरूस्ती करण्यात येईल. तसेच नियामक विभागाची मंजूरी घेऊनच उड्डाण केले जाईल.”

आमच्या ग्राहकांची, कर्मचाऱ्यांची आणि विमानाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या घटनेमुळे आमच्या कामकाजावर कमीत कमी परिणाम व्हावा, याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असेही इंडिगोच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले.

टेल स्ट्राइक म्हणजे काय?

टाइम्स ऑफ इंडियाने एव्हिएशन संकेतस्थळ स्कायब्रेरीचा हवाला देत सांगितले की, टेकऑफ किंवा लँडिंग दरम्यान विमानाच्या शेपटीचा भाग (मागची बाजू) धावपट्टीला स्पर्श करतो त्याला टेल स्ट्राइक असे म्हणतात. आकडेवारीनुसार, बहुतेक टेल स्ट्राइक हे लँडिंग दरम्यान होतात. यात बहुसंख्यवेळा मानवी चूक असते तर अनेकदा जोरदार वारे, हवामानातील बदल किंवा इतर घटनाही कारणीभूत असू शकतात.

मुसळधार पावसाचा विमानसेवेला फटका

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या ३५० हून अधिक विमानांना विलंब झाल्याची बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. दोन उड्डाणे वळविण्यात आली आहेत तर डझनभरहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.

फ्लाइटरडारच्या आकडेवारीनुसार, मुंबई विमानतळावरून निघणाऱ्या २८३ विमानांना उड्डाणासाठी उशीर झाला आहे. तर मुंबईत येणाऱ्या ७७ विमानांना वेळापत्रकानुसार उतरण्यास विलंब झाला आहे. शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस पडल्यामुळे विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाली.