‘लोकसत्ता’तर्फे पुढील आठवड्यात परिषद; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह नामवंतांचा सहभाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनाचा संसर्ग कमी झाल्यावर राज्यात पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असतानाच, रोजगारनिर्मिती आणि महसुली उलाढालीच्या पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रातील संधी आणि भविष्यातील वाटांचा धांडोळा घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने येत्या २९ तारखेला खास ‘पर्यटन परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह या क्षेत्रातील नामवंत या परिषदेत या उद्योगाच्या भविष्याचा वेध घेतील.

महाराष्ट्राला निसर्ग आणि सांस्कृतिक वारशाचे देणे लाभले आहे. विदर्भातील ताडोबासारख्या जंगलांमधील व्याघ्र पर्यटन, बुलढाण्याचे लोणार सरोवर, अजिंठा-वेरुळची लेणी, खंडाळा-लोणावळा, महाबळेश्वरसारखी थंड हवेची ठिकाणे, रायगड-सिंधुदुर्गसारखे गडकिल्ले, ७२० कि.मी. पसरलेल्या कोकण किनारपट्टीवरील अलिबागपासून ते तारकर्लीपर्यंतचे नयनरम्य सागरी किनारे अशी वैविध्यपूर्ण ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरांपासून ते पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर, जेजुरी, वणी, त्र्यंबकेश्वर, परळी-वैजनाथसारखी ठिकाणे ही धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. अजंठा-एलोरा लेणी तर विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील लाखो पर्यटक या ठिकाणांना भेट देतात. 

  करोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटन व आदरातिथ्य उद्योगाला मोठा फटका बसला आहे. आता करोनाचे सावट दूर होत असल्याने दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामात पर्यटनाला पुन्हा चालना मिळण्याची अपेक्षा असून पर्यटन उद्योग पुन्हा भरारी घेण्यासाठी आतुर आहे. देशांतर्गत विमानसेवा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती व भविष्यातील योजना याबाबतची चर्चा या परिषदेत होईल.

   पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पर्यटन व आदरातिथ्य उद्योग क्षेत्रातील नामवंत मंडळी सद्य:स्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी काय आवश्यक आहे याबाबत भाष्य करतील.

भविष्यातील योजनांवर…

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पुढे आणण्यासाठी नवनव्या कल्पना मांडत असून सध्या सुरू असलेले उपक्रम आणि आपल्या भविष्यातील योजनांबाबत ते या परिषदेत विचार मांडतील.

उपायांसाठी व्यासपीठ…  पर्यटन विभाग आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील व्यावसायिकांना पर्यटन क्षेत्रातील अडचणी, संधी व संभाव्य उपाययोजना यांची चर्चा होण्यासाठी एक व्यासपीठ या परिषदेच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र

सह प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

कॉर्पोरेट पार्टनर : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Initiatives for tourism promotion loksatta tourism minister aaditya thackeray akp
First published on: 23-10-2021 at 01:23 IST