August Kranti Din : भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा करण्याकरता ऑगस्ट क्रांती मैदानात जाणाऱ्या महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुबंई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याबाबत तुषार गांधी ट्वीट करून माहिती दिली होती. दरम्यान, त्यांना आता सोडण्यात आले असून ते पुन्हा ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने रवाना झाले असल्याचेही त्यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे. दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

तुषार गांधी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, भारत छोडो आंदोलनाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मी ९ ऑगस्टला घराबाहेर पडलो, पण सांताक्रूझ पोलिसांनी मला ताब्यात घेतले. मला माझ्या आजोबांचा, महात्मा गांधींचा आणि बा यांचा अभिमान आहे, ज्यांना या ऐतिहासिक तारखेला ब्रिटिशांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, पोलिसांनी त्यांना आता जाण्याची परवानगी दिली आहे. ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने जाण्याकरता त्यांनी एक टॅक्सी थांबवली. परंतु, टॅक्सीवाल्याने कोणत्याही कारवाईत अडकायचं नसल्याचे सांगत भाडे नाकारले असल्याचंही ट्वीट गांधी यांनी केलं आहे. या ट्वीटनंतर त्यांनी चलो ऑगस्ट क्रांती मैदान असंही ट्वीट केलं आहे.

ऑगस्ट क्रांती दिन

८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. ब्रिटीशांना भारत सोडून जाण्यास भाग पाडण्यासाठी ‘करो या मरो’ या घोषणेवर आंदोनल सुरु करण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. आणि ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळायचं ठरलं. हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील ‘ऑगस्ट क्रांती दिवस’ म्हणून ओळखला जातो. आजपासून ८० वर्षापूर्वी झालेल्या ‘ऑगस्ट क्रांती दिना’ने भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेला सुरुंग लावला आणि पुढे १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं.