मुंबई : गेल्या सात वर्षांमध्ये मुंबईमधील रस्ते बांधणी आणि खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या कारखान्यात तब्बल १३ कोटी २१ लाख १८ हजार किलो (एक लाख ३२ हजार ११८ मेट्रिक टन) गरम डांबरमिश्रित खडीचे (हॉटमिक्स) उत्पादन करण्यात आले आणि त्यावर पालिकेने साधारण ६६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. मात्र कोटय़वधी रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होत असल्यामुळे या काळात उत्पादित करण्यात आलेल्या गरम डांबरमिश्रित खडीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, नालेसफाई, रस्त्यांच्या कामांप्रमाणेच गरम डांबरमिश्रित खडीच्या उत्पादनाचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुंबईमधील रस्ते बांधणी आणि खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक असलेल्या गरम डांबरमिश्रित खडीचे वरळी येथील पालिकेच्या कारखान्यात उत्पादन करण्यात येते. रस्ते बांधणीसाठी, तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयांना या कारखान्यातून डांबरमिश्रित खडीचा पुरवठा करण्यात येतो. गेल्या सात वर्षांमध्ये वरळीच्या कारखान्यामध्ये तब्बल १३ कोटी २१ लाख १८ हजार किलो गरम डांबरमिश्रित खडीचे उत्पादन करण्यात आल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून उघडकीस आले आहे. प्रतिमेट्रिक टन गरम डांबरमिश्रित खडीपोटी पालिकेला सरासरी पाच हजार रुपये खर्च आला. त्यानुसार गेल्या सात वर्षांत पालिकेने गरम डांबरमिश्रित खडीपोटी सुमारे ६६ कोटी रुपयांहून अधिक खर्च केले. मात्र तरीही पावसाच्या तडाख्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांमुळे या मिश्रणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते बांधणी आणि खड्डे बुजविण्यासाठी गरम डांबरमिश्रित खडीचा वापर करण्यात येत होता. पावसाळ्यात हे मिश्रण टिकाव धरत नव्हते. तरीही त्याचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे या संदर्भात लवकरच अहवाल मागविण्यात येईल.
– अजोय मेहता, पालिका आयुक्त
पावसाळ्यातील दमट वातावरणात गरम डांबरमिश्रित खडीचा उपयोग होत नव्हता, मग गेली सात वर्षे त्याचा का वापर करण्यात आला. करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेले कोटय़वधी रुपये या मिश्रणापोटी खर्च करण्यात आले आहेत. नालेसफाई, रस्त्याच्या कामांप्रमाणेच यातही मोठा घोटाळा झाला असून या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे.
– रवी राजा, विरोधी पक्षनेता
