काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी
मुंबई : सध्या मतदान यंत्राबद्दल (ईव्हीएम) लोकांच्या मनात शंका आहे, त्यामुळे स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रांच्या परिसरात जॅमर बसवावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्याकडे केली आहे.
विधानसभा निवडणुकीची २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर थोरात यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. मतदानयंत्रांमध्ये गडबड केली जाऊ शकते, अशी जनभावना असल्याने मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर आकडेवारी तात्काळ जाहीर करावी व त्यानंतरच पुढच्या फेरीची मोजणी करावी. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी. तसेच कोणत्याही मतदान यंत्राबाबत शंका निर्माण झाल्यास त्या मतदान यंत्रातील मतांची मोजणी सलग चार वेळा करण्यात यावी आणि ५० टक्के व्हीव्हीपॅटची मोजणी करावी, अशा मागण्या बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.
‘मतदान केंद्रनिहाय अंदाज सांगा’
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच मतदानोत्तर चाचण्या जाहीर करण्याची स्पर्धा वृत्तवाहिन्यांमध्ये लागली होती. मतदान केंद्रावर मतदार रांगेत उभे असतानाच सायंकाळी ६ वाजता वाहिन्यांनी अंदाज व्यक्त करायला सुरुवात केली. विविध वाहिन्यांनी जाहीर केलेले आकडे वस्तुस्थितीदर्शक नसल्याने जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे ज्या वृत्तवाहिन्यांनी या चाचण्या जाहीर केल्या आहेत त्यांनी मतदारसंघनिहाय व बूथनिहाय निकाल जाहीर करावेत, अशी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.
