‘मुंबई महानगर प्रदेश जल वाहतूक सेवा’ यंत्रणेची निर्मिती; सार्वजनिक वाहतुकीचा नवीन पर्याय
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेवरील आणि रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मुंबई महानगर प्रदेशांतर्गत जलवाहतुकीच्या योजनेला आता वेग मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मरिा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी आदी महापालिकांच्या क्षेत्रात ही जलवाहतूक सेवा येत्या वर्षभरात सुरू करण्याची योजना आहे. त्यासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश जलवाहतूक सेवा’ या स्वतंत्र यंत्रणेची निर्मिती करण्यात येणार आहे.
एकटय़ा मुंबईतच ७५ लाख प्रवासी उपनगरीय रेल्वे सेवेचा वापर करतात. एखाद्या दिवशी रेल्वे सेवा कोलमडल्यास प्रवाशांचा मोठा खोळंबा होतो. प्रवाशांची वाढती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जल वाहतुकीच्या पर्यायावर गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. पर्यावरण, सुरक्षा आदी अनेक कारणांमुळे गेली अनेक वर्षे जलवाहतुकीचे घोंगडे सरकारी पातळीवर भिजत होते. मात्र, मुंबई व नजीकच्या उपनगरांतर्गत जल वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी आदी महापालिकांच्या हद्दीत सागरी व खाडी क्षेत्र येत असून त्याचाच वापर जलवाहतुकीसाठी करण्यात येईल. रो-रो सेवा किंवा मिनी क्रूझ बोटींमार्फत ही जल वाहतूक होईल.
यासाठी वसई, भाईंदर तर ठाण्यात घोडबंदर, कोलशेत, साकेत येथे आणि ट्रॉम्बे, वाशी, करावे, सीबीडी बेलापूर, दिवा, भिवंडी, कल्याण, मुलुंड येथील जागांची जेट्टी बांधणीसाठी पाहणी करण्यात आल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बंदर अधीक्षकांनी सांगितले.
जेट्टीसाठी जागा व त्यांना जोडणारे रस्ते यांची उपलब्धताही या वेळी तपासण्यात आली. यासाठी संबंधित महापालिकांच्या आयुक्तांसोबत दोनदा बैठक झाली असून त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
कोकणातही सेवा
मुंबईनजीकच्या महापालिका क्षेत्रात या जलवाहतूक सेवा येत्या वर्षभरात सुरू होणार असून भाऊचा धक्का येथून जयगड, विजय दुर्ग, मालवण येथे येत्या जानेवारीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार असून पुढील महिन्यात दिघी येथील जल वाहतूक सुरू होत आहे. तसेच, मुंबई ते मांडवा रो-रो सेवेच्या धर्तीवर बेलापूर ते मांडवा सेवादेखील सुरू होईल. क्रूझ प्रकारातील या सेवा असून यात प्रवाशांना अल्पोपहार व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.
मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरांतील वाहतूक सेवेवर सध्या ताण असून हा ताण कमी करण्यासाठी मुंबई नजीकच्या महापालिकांतर्गत ही जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. हा प्रस्ताव केंद्रीय नौकानयन मंत्रालायच्या ‘सागरमला’ या योजनेतून करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
– अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ