९० कि.मी. ताशी वेग राहणार; ३५ मिनिटांचा प्रवास, १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ असा जलद प्रवास करण्यासाठी नवीन मेट्रो रेल्वे लाइन टाकण्यात येणार आहे. सध्याच्या मेट्रो रेल्वेची जास्तीत जास्त ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा आहे. प्रस्तावित मेट्रो रेल्वे ताशी ९० किलोमीटर वेगाने धावणार आहे. त्यामुळे साधारणत: मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे ३५ किलोमीटरचे अंतर जवळपास तेवढय़ाच मिनिटांत पार केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी १८ हजार कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज आहे.

एका शहरात दोन विमानतळे असतील तर त्यांना जोडणारा एखादा मार्ग आवश्यक असतो. त्यानुसारच मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा नवीन मेट्रो प्रकल्प तयार करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशाला पुढचा प्रवास नवी मुंबई विमानतळावरून करायचा असेल, तर त्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी जलदगती प्रवासाची व्यवस्था करण्याची आवश्यकता असते. विमान प्रवाशाकडे सामान असते ते घेऊन मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळापर्यंत रस्त्यावरून प्रवास करायचे म्हटल्यास, वाहतूक कोंडीमुळे तो वेळेवर पोहोचू शकणार नाही. त्यासाठी दोन विमानतळांमधील जलद व विनाअडथळा प्रवासासाठी नवीन मेट्रो रेल्वे लाइन टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा खर्च एमएमआरडीए व सिडकोने करावा, असा प्रस्ताव आहे.

असा असेल मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे साधारण ३५ किलोमीटरचे अंतर आहे. त्यातील सांताक्रूझ ते गोवंडी हा ८ किलोमीटरचा टप्पा भुयारी असेल आणि त्यापुढील म्हणजे मानखुर्दपासून ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा टप्पा उन्नत असेल, अशी माहिती देण्यात आली.

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. साधारणत: दोन-तीन महिन्यांत अहवाल तयार होईल, त्यानंतर प्रकल्पाबाबतची पुढील कार्यवाही सुरू होईल.    – प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International airport in navi mumbai
First published on: 18-12-2017 at 01:44 IST