मुंबई : ठाण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) एकमेव स्वारस्य निविदा सादर झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा विकास करण्यासाठी ठाण्यातील ५० एकर जागा एमसीएला देण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास ठाण्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येईल.

एमएसआरडीसीच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगतच्या जागा निविदा प्रक्रियेअंतर्गत विविध खासगी संस्था, कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीतील आमणे गावापासून काही अंतरावरील ५० एकर जागा क्रिकेट मैदानासाठी ६० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. भिवंडीतील वडपे गावापासून ५ किमी अंतरावर ही जागा असून सध्या ही जागा एमएसआरडीसीच्या ताब्यात आहे. क्रिकेट मैदानासाठी राखीव असलेली ही जागा विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबर २०२३ मध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकासित करण्यासाठी इच्छुक संबंधित संस्थेचा अनुभव, त्यांचे किती खेडाळू राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले आहेत. सदस्य संख्या आदी बाबींची पडताळणी करण्यात येणार होती. त्यानुसार जानेवारीत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत एकमेव एमसीएने स्वारस्य दाखवत अर्ज सादर केल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा :ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ईशान्य मुंबईतील झोपडपट्ट्यांचा विकास संथगती

एमसीएच्या निविदेची छाननी करून एमएसआरडीसीने ५० एकरचा भूखंड एमसीएला देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास हा भूखंड एमसीएकडे हस्तांतरित करण्यात येणार असून एमसीए या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकसित करणार आहे. आचारसंहितेनंतरच या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे मैदान विकसित झाल्यास ठाण्याला पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होणार आहे.