मुंबई : पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द व शिवाजी नगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून मुलुंडपासून घाटकोपरपर्यंत असलेल्या डोंगरांवर, तसेच विक्रोळीमधील खाडी भागात आणि मानखुर्द व शिवाजी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या विस्तारल्या आहेत. या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना स्वच्छ, पुरेसे पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय आदी अनेक मूलभूत समस्या भेडसावत आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या झोपडपट्टीतील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या भागातील बहुतांश झोपडपट्टींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अद्यापही मार्गी लागलेली नाही. परिणामी, या भागातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या जास्त आहे. हा मध्यमवर्गीय घटक सर्वाधिक झोपडपट्टी परिसरातच वास्तव्यास आहे. मुलुंडमध्ये गौतम नगर, विजय नगर नाईकवाडी नगर याबरोबरच डोंगराळ भागात असलेल्या झोपडपट्ट्या, भांडुप पश्चिमेकडील टेंबीपाडा, महाराष्ट्र नगर, पठाण कॉलनी, समर्थ नगर येथील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे.

हेही वाचा…उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

पर्यावरणीय मुद्द्यांचा प्रभाव

ईशान्य मुंबईचा पश्चिमेकडील भाग डोंगराळ, तर पूर्वेकडील भाग खाडीलगत व मिठागरांचा आहे. भांडुपमधील टेंबीपाडा परिसर नॅशनल पार्कच्या जवळ असल्याने हा भाग हरित पट्टा म्हणून घोषित आहे. त्याचा परिणाम विकासावर होत आहे.

फिल्टर पाडा हा परिसर मिठी नदीचे उगमस्थान आणि डोंगराळ भागात येतो. विक्रोळी पूर्वेकडील झोपडपट्टी व काही इमारती खाडी भागात, तर काही वन विभागातंर्गत येत असल्याने त्यांना पर्यावरण विभागाची परवानगी हवी आहे.

हेही वाचा…ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

डोंगराळ व खाडी भागासह काही झोपडपट्ट्या गावठाणात वसलेल्या आहेत. सरकारने गावठाण संरक्षणाचा निर्णय घेतल्याने या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडला आहे. शिवाय पूर्व द्रुतगती मार्गावर नाहूरलगत असलेल्या नवी मुंबईच्या सीमेलगत फ्लेमिंगो पार्क उभारण्यत आले आहे.