मुंबई : ओडिशामधील ८४५.७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या ‘सिमिलिपाल’ उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला असून ओडिशा सरकारने २४ एप्रिल २०२५ रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. सिमिलिपाल उद्यान भारतातील १०७ वे आणि ओडिशातील दुसरे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. सिमिलिपाल उद्यानात दुर्मिळ काळे वाघ (मेलॅनिस्टिक) आढळतात.
मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल दक्षिण आणि उत्तर वन विभागांतील ११ रेंजमध्ये हे उद्यान पसरले आहे. भारतातील एकमेव अशा सिमिलिपाल उद्यानात दुर्मिळ काळे वाघ (मेलॅनिस्टिक) आढळतात. सिमिलिपाल हे युनेस्कोच्या बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये समाविष्ट असून, प्रोजेक्ट टायगर आणि हत्ती राखीव क्षेत्राचा भाग आहे.
काळ्या वाघाची नोंद केव्हा ?
एका आदिवासी तरुणाने १९९३ साली स्वसंरक्षणासाठी एका ‘मेलॅनिस्टिक’ वाघिणीला ठार मारल्याची नोंद आहे. त्यानंतर २००७ पर्यंत हे वाघ व्याघ्रप्रकल्पात सापडले नाहीत. या व्याघ्रप्रकल्पात २००७ मध्ये ‘मेलॅनिस्टिक’ वाघ आढळला. त्यावेळी कॅमेरा ट्रॅपमध्ये तीन काळ्या वाघांचे छायाचित्र कैद झाले होते. त्यानंतर वाघांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.
डीएनएमधील ‘टॅकटेप’ जनुकातील बदल
या व्याघ्रप्रकल्पात काळ्या वाघांचे प्रमाण साधारण ३० टक्के आहे. काळा वाघ जन्माला येण्यासाठी आई आणि वडील या दोघांकडून येणाऱ्या डीएनएमधील ‘टॅकटेप’ जनुकात हा बदल असावा लागतो. काही वर्षापूर्वी केलेल्या संशोधनानुसार, सिमिलीपालबाहेरील जवळजवळ ४०० वाघांचे डीएनए तपासले. इतर जंगलामधील एकाही वाघाच्या डीएनएमध्ये त्यांना हा बदल आढळला नाही. सिमिलीपालमधील ३० टक्के वाघ काळे असले तरी इथल्या जुन्या नोंदीत अशा वाघाची नोंद तुरळकच आढळते. त्यामुळे बऱ्याच वर्षात या जंगलात शेजारील इतर जंगलातून वाघ आल्याची किंवा येथील वाघ इतर जंगलात गेल्याची शक्यता खूप कमी आहे.
‘मेलॅनिस्टिक’ म्हणजे काय?
मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य सजीवांच्या त्वचेचा, केसांचा रंग ठरवण्यास कारणीभूत असते. ‘मेलॅनिन’चाच एक प्रकार म्हणजे ‘युमेलॅनीन’. प्राण्यांमध्ये ‘युमेलॅनीन’ हे रंगद्रव्य त्यांच्या काळ्या रंगाच्या त्वचेसाठी कारणीभूत ठरते. ‘इनब्रीडिंग’ म्हणजेच जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्ती. या साऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून दाट काळ्या रंगाचे पट्टे असलेल्या या वाघांची निर्मिती झाली आहे.
पर्यटन
सिमिलिपालमध्ये बरेहीपाणी आणि जोरांडा धबधबे, लुलुंग, सिटाकुंड आणि मेघासनी ही पर्यटनस्थळे आहेत. राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यामुळे येथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
स्थान आणि क्षेत्रफळ
सिमिलिपाल राष्ट्रीय उद्यान ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात आहे. हे उद्यान ८४५.७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. संपूर्ण सिमिलिपाल बायोस्फिअर रिझर्व्हचे क्षेत्रफळ ४,३७४ चौरस किलोमीटर इतके आहे, त्यामध्ये कोअर क्षेत्र (८४५ चौरस किलोमीटर), बफर क्षेत्र (२,१२९ चौरस किलोमीटर) आणि ट्रान्झिशन क्षेत्र (१,४०० चौरस किलोमीटर) यांचा समावेश आहे.