लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा गेल्या दोन तासांपासूनआमदार रवींद्र वायकर यांची चौकशी करीत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या क्रीडांगण आणि उद्यानाच्या जागेवरही अनधिकृत ताबा घेऊन ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला होता.

आर्थिक गुन्हे शाखेकडे येणाऱ्या तक्रारीप्रकरणी सर्वात आधी प्राथमिक चौकशी केली जाते. तक्रारीमधील आरोपांमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच आरोपांमध्ये तथ्य न आढळल्यास याप्रकरणाची प्राथमिक चौकशी बंद केली जाते. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांकडे सोमय्या यांनी तक्रार केली होती. पण ती तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली होती.

आणखी वाचा-मुंबईत बड्या उद्योगपतीकडून अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार, गुन्हा दाखल

रवींद्र वायकर यांनी ट्रस्टच्या नावाने गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेले खुले क्रीडांगण व उद्यानासाठी असलेल्या जागेवर रवींद्र वायकर यांनी अनधिकृत ताबा घेतला आहे. तिथे दोन लाख चौरस फुटांचे पंचतारांकित हॉटेल बांधण्यास सुरुवात केली आहे. जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर हे बांधकाम सुरू आहे. या हॉटेलची किंमत ५०० कोटी रुपये इतकी होत असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवींद्र वायकर यांनी ही जागा एका कंपनीकडून ताब्यात घेतली होती. बागेचे आरक्षण दाखवून चार कोटी रुपये रेडी रेकनर मूल्याचा भूखंड तीन लाख रुपयांना खरेदी केला. त्यानंतर या भूखंडावरील ३३ टक्के जागेवर वायकर यांनी बँक्वेट बांधले. गेली अनेक वर्षे या जागेवर लग्न, पार्टी असे अनधिकृत व्यवहार सुरू आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.