लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे रविवारी पहाटे गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी रेल्वे पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये दहा प्रवासी जखमी झाले होते. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीची रेल्वे पोलिसांनी सोमवारी चौकशी सुरू केली. वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला. या चेंगराचेंगरीत १० प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या दुर्घटनेची प्राथमिक तपास करण्याचा निर्णय पोलिसांनीही घेतला आहे.

आणखी वाचा-बाणगंगा महोत्सवासारख्या कार्यक्रमांचा मतदान जनजागृतीसाठी विचार करावा, अश्विनी जोशी यांच्या सूचना

वांद्रे टर्मिनसमधील फलाट क्रमांक १ वर रविवारी पहाटे पावणे तीन वाजता वांद्रे – गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस येत होती. त्याच वेळी काही प्रवाशांनी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. ट्रेन पहाटे सव्वा पाच वाजता निघणार होती. दरम्यान, या दुर्घटनेची रेल्वे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या वेळी स्थानकात पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक उपस्थित होते. परंतु मोठ्या संख्येने प्रवासी वांद्रे टर्मिनसवर दाखल झाल्याने तेथील व्यवस्था कोलमडली. या दुर्घटनेत १० जण जखमी झाले. त्यात इंद्रजित शहानी (१९) आणि नूर मोहम्मद शेख (१८) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी १० जणांपैकी सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील तिघांना वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध उपचार करून घरी पाठविण्यात आले. इतर जखमी प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे.

आणखी वाचा-मुंबई : ‘मेट्रो२ ब’च्या कामात कंत्राटदाराकडून पुन्हा दिरंगाई

नेमकं काय घडलं ?

दिवाळी आणि छट पूजेनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक उत्तर भारतात जात आहेत. त्यासाठी रेल्वेने विशेष लोकल सोडल्या आहेत. वांद्रे टर्मिनसवर प्रवाशांनी चालत्या गाडीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे दोनजण पडले आणि ही दुर्घटना घडली. एक रेल्वे गोरखपूरसाठी यार्डातून फलाटावर येत होती. त्याचवेळी काही प्रवाशांनी एक्स्प्रेस रेल्वे फलाटावर थांबण्यापूर्वीच त्यात शिरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रेल्वे पहाटे सव्वा पाच वाजता गोरखपूरसाठी रवाना होते. पण सणासुदीचा काळ असल्याने प्रवाशांना बसायला वेळ मिळावा म्हणून तीन तास आधीच रेल्वे फलाटावर उभी करण्यात येत आहे. वांद्रे – गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस पूर्णपणे विनाआरक्षित होती. त्यामुळे प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. जागा मिळवण्यासाठी प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. चेंगराचेंगरी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले.