आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील मुख्य सूत्रधार दाऊद आजही मुंबईत सक्रिय असून त्याची टोळी सध्या हवाला, क्रिकेट सट्टेबाजी व बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इक्बालची चौकशी करायची आहे, अशी मागणी ईडीने विशेष न्यायालयाकडे केली होती. विशेष न्यायालयानेही त्याची दखल घेत इक्बालला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इक्बालला पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यापूर्वी ईडीने ठाणे पोलिसांकडून त्याचा ताबा घेतल्यावर या प्रकरणी त्याला अटक केली.
दाऊदची बहीण हसीना पारकर, इक्बाल आणि गुंड छोटा शकीलचा मेहुणा यांच्या मुंबईतील १० मालमत्तांवर ईडीने नुकतेच छापे टाकले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाऊदविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने हे छापे टाकले होते.
‘अटकेत असूनही व्यावयायिकांना धमक्या’
इक्बाल हा ठाणे येथे दाखल खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. परंतु तेथूनही तो दाऊदची भीती दाखवत व्यावसायिकांकडून पैसे उकळत होता. तो दाऊदच्या नेतृत्वाखालील टोळीचा प्रमुख सदस्य होता. त्याच्या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती उघड होऊ शकते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात इक्बालचीही चौकशी करायची असल्याचे ईडीतर्फे त्याची कोठडी मागताना न्यायालयाला सांगण्यात आले. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनीही ईडीची मागणी मान्य करून इक्बालला २४ फेब्रुवारीपर्यंतची ईडी कोठडी सुनावली.