‘सिनेमाचा चालता बोलता इतिहास’ असा ज्यांचा कौतुकाने उल्लेख केला जायचा ते ज्येष्ठ चित्रपट समीक्षक, अभ्यासक इसाक मुजावर यांचे गुरूवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ८१ वर्षीय इसाक मुजावर यांच्या पश्चात रुकसाना आणि रुबिया या दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.  
पंधरवडय़ापूर्वी इसाक मुजावर यांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याकारणाने नेरूळ येथील तेरणा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी दुपारी  मूत्रपिंडावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांना भूल देण्यात आली. मात्र, त्यावेळी त्यांचा रक्तदाब कमी झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांची कन्या रुकसाना यांनी दिली.
गेली सत्तर वर्ष चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक म्हणून कार्यरत असलेले इसाक मुजावर हे मूळचे नाशिकचे होते. १९७८ मध्ये ते नाशिकमधून मुंबईत आले आणि त्यानंतर सिनेमाच्या माया जगतात त्यांची मुशाफिरी सुरू झाली. ‘चित्रानंद’  हे साप्ताहिक मासिक त्यांनी सुरू केले. त्यानंतर ‘रसरंग’ या साप्ताहिक मासिकाचे संपादकपदही त्यांनी भूषवले होते.
सिनेमा आणि सिनेमा गाजवणारे कलावंत यांचे बारीकसारीक तपशीलही ते सहजपणे मांडत असत. त्यामुळे त्यांना ‘हिंदी-मराठी सिनेमाचा चालता बोलता इतिहास’ असे कौतूकाने संबोधले जात असे. ‘लोकसत्ता’च्या चित्रपटविषयक ‘रंगतरंग’ या अभ्यासपूर्ण पुरवणीत त्यांनी स्तंभलेखन केले होते.